नांदेड-प्रतिनिधी
किनवट – माहूर विधानसभा क्षेत्रात १३ महसूल मंडळात मागील दिनांक २०,२१आणि २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पुल व शेतीचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देऊन पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या रस्ते आणि पूल दुरुस्तीसाठी निधीची मागणी आमदार भीमराव केराम यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नांदेड दौऱ्यावर असताना भीमराव केराम यांनी आज दिनांक २३ रोजी त्यांची भेट घेऊन जनतेच्या हिताच्या जीवनावश्यक मागण्याचे विस्तृत निवेदन दिले.
मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे माहूर किनवट तालुक्यातील जनजीवक पूर्णतः विस्कळीत झाले आहे. यात प्रामुख्याने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतीसुद्धा खरडून गेली आहे,शिवाय संततधार सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर येऊन पुल व अंतर्गत पक्के रस्ते संपूर्णतः खरडून गेल्याने वाहतूक व्यवस्था ही प्रभावित झाली आहे. या गंभीर परिस्थितीचे अनुषंगाने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नांदेड दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांची आज भेट घेऊन आमदार भीमराव केराम यांनी अतिवृष्टी दरम्यान माहूर आणि किनवट तालुक्यात निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा पालकमंत्र्यांसमोर मांडून शेतकरी व सर्वसामान्य हिताचे मागण्या असलेले विस्तृत स्वरूपाचे निवेदन दिले या निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये
दिनांक २० ते २२ जुलै दरम्यान झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे किनवट माहूर मतदार संघातील सर्वच प्रमुख मार्ग व त्यावरील पुल व रस्ते पुर्णतः खरडून वाहुन गेल्याने गेल्या तीन ते चार दिवसा पासुन तेलंगाना,विदर्भ यवतमाळ व नांदेड या सर्वच प्रमुख राज्य आणि जिल्हा मार्गावरील रहदारी बंद आहे. त्यात याच अतिवृष्टीमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने श्रीमती भारतीबाई सुभाष पवार राहणार दहेली या शेतकरी महिलेने परिस्थिती पाहून नजिकच्या विहीरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली.तसेच माहूर येथील टाकळी (चोलेवाडी) येथे पनगंगेच्या नदीपात्रात भागवत रामचंद्र भंडारी,त्याचा मुलगा आणि सुन तसेच ९ जनावरे पुरात अडकले असता प्रशासनाने माझ्या सुचने नुसार ताबडतोब एसडीआरएफ ची टीम पाठवून त्यांना वाचविले परंतु महाभयंकर झालेल्या अतिवृष्टीमुळे किनवट माहूर मतदार संघास लागून वाहत असलेल्या पैनगंगा नदी परीसरातील शेतकरी पुरामुळे १०० टक्के बाधित झाले असुन शेतीत कुठलेही पिक येऊ शकणार नाही.अशी अवस्था जमिनीची झाली आहे,त्यात किनवट-माहूर तहसिलदार व कृषिविभाग तसेच बांधकाम विभागानी प्राथमिक स्वरुपात नुकसान झलेले विवरण जे उपलब्ध करुन दिले आहे व मी स्वतः जायमोचक्यावर जाऊन पहाणी केली असता परिस्थिती अतिशय गंभीर असून विनाविलंब रस्ते व पुल दुरुस्त करून रहदारी पूर्ववत करणे,आवश्यक आहे.तसेच शेतकऱ्यांचे शेतातील नुकसान व गावामध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात घरांची झालेली पडझड यांचे त्वरीत पंचनामे करुन तात्काळ आर्थिक अनुदान मंजुर करणे आवश्यक असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली आहे.
शिवाय आपत्कालीन निधीतुन अनुदान मंजुर होईपर्यंत सानुगृह अनुदान वाटप करण्याचे व तसेच रस्ते व पुल त्वरीत दुरुस्त करून रहदारी पूर्ववत करण्यासाठी सबंधीतांना आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी आमदार भीमराव केराम यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माहूर किनवट तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी एक प्रकारे आमदार केराम यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले असून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा मुकाबला करावा प्रत्येक शेतकऱ्याच्या दुःखात ते व्यक्तीस सहभागी असल्याचेही संदेश या निमित्ताने आमदार के राम यांनी दिला आहे.एकंदरीत माहूर किनवट तालुक्यातील अतिवृष्टीच्या मार्मिक परिस्थितीची वास्तव मांडणी आमदार भीमराव केराम यांनी पालकमंत्री यांच्यासमोर करून शक्य तितक्या लवकर मदतीची मागणी केली असून केरामांच्या मागणीला पालकमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार भीमराव केराम यांनी दिली आहे.