• Mon. Nov 25th, 2024

    पावसाळी पर्यटनाला जाताय तर पहिली बातमी वाचा; इगतपुरीतील ‘हा’ किल्ला पर्यटनासाठी बंद, कारण…

    पावसाळी पर्यटनाला जाताय तर पहिली बातमी वाचा; इगतपुरीतील ‘हा’ किल्ला पर्यटनासाठी बंद, कारण…

    म. टा. वृत्तसेवा, घोटी : इगतपुरी तालुक्यातील ऐतिहासिक व पुरातन वारसा लाभलेल्या कावनई किल्ल्याचा वाकी-बिटूर्ली परिसराकडून काही भाग कोसळल्याने जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाने तात्काळ दाखल घेत या किल्ल्यावर पर्यटकांना बंदी घातली आहे. दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी शनिवारी घटनास्थळी धाव घेत उपाययोजनांचा आढावा घेतला.

    प्राथमिक स्तरावरील उपाययोजना म्हणून या किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या पाच ते सहा कुटुंबीयांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले असून, या भागात शेतीची कामे करण्यासही मज्जाव करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच शनिवारी आमदार हिरामण खोसकर, ‘मविप्र’ संचालक संदीप गुळवे, गोरख बोडके, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच उपाययोजना व झालेले नुकसान याबाबत स्थानिकांशी चर्चा केली. दरम्यान, या घटनेमुळे शेती, पिकांचे झालेल्या नुकसानीबाबत प्रशासकीय स्तरावर पंचनामे करण्याच्या सूचना आमदार खोसकर यांनी दिल्या.
    ‘कास’ला जाताय तर पहिली बातमी वाचा, ‘हा’ घाट बंद असणार, उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती
    ग्रामपंचायतीने लावला फलक

    कावनई किल्यावर दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने या किल्ल्यावर पर्यटकांना मनाई करण्यात आली. याबाबत कावनई ग्रामपंचायतीने फलक लावला असून, किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या सर्वांनाच प्रशासनाने नोटीस पाठविल्या आहेत. विकेंड असल्याने पर्यटकांना रोखण्यासाठी घोटी पोलिस यांच्यासह कावनईच्या सरपंच सुनीता पाटील, चेअरमन शिवाजी शिरसाठ, गोपाळ पाटील, पोलिसपाटील रुपाली शिरसाठ, वाकी सरपंच किसन कुंदे, निवृत्ती शिरसाठ, वाकी पोलिसपाटील रोहिदास काळे, सपन परदेशी, खंडू परदेशी, ग्रामसेवक शरद राहाडे, ग्रामसेवक ज्योती केदारे, वनपाल निशा पाटील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *