• Mon. Nov 25th, 2024

    रस्त्यांवरच भरतोय ‘बार’चा दरबार! पुण्यात खुले आम सुरु आहेत मद्यपानाचे ‘अड्डे’, कारवाई कधी?

    रस्त्यांवरच भरतोय ‘बार’चा दरबार! पुण्यात खुले आम सुरु आहेत मद्यपानाचे ‘अड्डे’, कारवाई कधी?

    पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत मद्यविक्रीच्या दुकानांबाहेरच (बार) मोठ्या संख्येने मद्यपींकडून मद्यपान केले जात असून, त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांनाच ‘बार’च्या ‘दरबारा’चे स्वरूप आल्याचे धक्कादायक चित्र आहे. स्वारगेट परिसरातील व्होल्गा चौक आणि ढोले पाटील रस्त्यावर खुलेआम सुरू असलेल्या या ‘ओपन बार’कडे स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत नाही. संबंधित दोन्ही ठिकाणे वर्दळीच्या रस्त्यावर असून, तेथून ये-जा करणाऱ्या महिला आणि तरुणींसाठी हे चित्र धोकादायक ठरू शकते.

    व्होल्गा चौकात उड्डाणपुलाखाली आणि ढोले पाटील रस्त्यावरील पदपथ म्हणजे बार असल्याप्रमाणेच मद्यपी तेथे बसून मद्यपान करतात. या मद्यपींची दारूसोबत चमचमीत पदार्थही चाखण्याची भूक भागविण्यासाठी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही तेथे व्यवसाय थाटला आहे. सातारा रस्ता आणि ढोले पाटील रस्ता या ठिकाणी मद्यविक्रीच्या दुकानांसमोरच खाद्यपदार्थांचे गाडे लागलेले असतात. ढोले पाटील रस्त्यावर एक आणि सातारा रस्त्यावर तीन-चार विक्रेते मद्यपींना चमचमीत खाद्य पुरवितात.

    सातारा रस्त्यावर स्वारगेट परिसरात लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळील येथील चौकातून सिटी प्राइड चित्रपटगृहाकडे जाताना चौकापासून अगदी दहा पावलांवर उड्डाणपुलाखालील भागात सायंकाळी सातनंतर मद्यपींचा रस्त्यावरील ‘अड्डा’ जमतो. अनेकदा वाहतुकीलाही त्याचा अडथळा होतो. या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला देशी विदेशी मद्याचे दुकान आहे. तेथे दारूची बाटली खरेदी करून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन मद्यपान केले जाते. अनेकदा दुपारीही तेथे काही जण मद्यपान करताना दिसतात. मात्र, त्यांची संख्या नगण्य असते.

    पोलिस ठाण्यापासून ३०० मीटरवरच ‘अड्डा’

    सातारा रस्त्यावरील मद्यपींचा अड्डा स्वारगेट पोलिस ठाण्यापासून अगदी २०० ते ३०० मीटर अंतरावर आहे. गेल्या काही दिवसांपासून केशवराव जेधे चौकात पोलिस रोज नाकाबंदी करीत आहेत. मात्र, पोलिस ठाण्यापासून जवळ असूनही स्वारगेट पोलिसांना हा रस्त्यावरचा अड्डा आजवर दिसलेला नाही. त्यामुळे राजरोसपणे तेथे मद्यपान केले जाते.

    पदपथ चालण्यासाठी नव्हे; मद्यपानासाठी

    ढोले पाटील रस्त्यावर सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला एका मद्यविक्रीच्या दुकानासमोरील पदपथावर आणि तेथील अन्य बंद दुकानांसमोर बसून मद्यपान चालते. त्यामुळे पादचाऱ्यांना एका बाजूचा पदपथ उपलब्धच होत नाही. तसेच, या ठिकाणी पाहणी केली असता दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे दिसले.
    महाराष्ट्राला हादरवणारी घटना! झुडपांत आढळले प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले जिवंत अर्भक
    का चालते रस्त्यावर मद्यपान

    – घरी मद्यपान करणे शक्य नाही आणि बारमध्ये खर्च परवडत नाही.
    – रस्त्यावर दारू पिण्याचा पर्याय स्वीकारला जातो
    – पाण्याच्या बाटल्या आणि अन्य खाद्यपदार्थही बारजवळील रस्त्यांवर उपलब्ध होतात

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *