• Sat. Sep 21st, 2024
अकोल्यात गावाला पुराचा वेढा; चिमुरडीची खालावली प्रकृती, रुग्णालयात पोहचण्याचे मार्ग बंद, पुढे काय घडलं?

अकोला: जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच अनेक भागात रुग्णसेवेची अवस्थाही बिकट झाल्याचे दिसून आले आहे. साधी वाहने जाऊ शकत नाही, तिथं रुग्णवाहिका जाणं दूरच होतं. दरम्यान असाच एक प्रसंग अकोल्यातील आगर गावात पाहायला मिळाला. एका ३ वर्षीय मुलीची प्रकृती खालावली अन् मदतीसाठी सर्व मार्ग बंद होते. अशा संकटातं सापडलेल्या मुलीच्या मदतीसाठी पुराच्या पाण्यातून वाट काढत अखेर बोट धावली आहे. प्रकृती नाजूक झालेल्या या चिमुकलीला वाचवण्यासाठी तिला बोटीतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मामा-भाचा राखणीसाठी शेतात गेले; ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत झोपले, रात्री अचानक आलेल्या पुरात तरंगू लागले अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील आगर गावात तीन वर्षीय आनंदी प्रदीप गव्हाळे ही मुलगी आजारी होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर आगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होता. इथे तिला ऑक्सिजन देखील लागलेला होता. परंतु काल रात्री सांयकाळी तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने आनंदी हिला तात्काळ पुढील उपचारासाठी अकोल्यात नेण्याचे डॉक्टरांनी सांगितले. दुसरीकडे अकोल्यात सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहे. अनेक गावांचे संपर्क तुटले आहे.

आगर गावातील मोरणा नदीला देखील मोठा पूर असल्याने मुख्य मार्ग बंद होता. हा मार्ग आगर उगवा अन् पुढे अकोट-अकोला मार्गाला जोडतो. परंतु पाण्याच्या पुरामुळे मुख्य गावाशी संपर्क तुटला होता. गावकऱ्यांचे प्रचंड हाल होत होते. त्यात आनंदीला उपचारकरिता अकोल्यात कसे न्यावे, असे अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात येऊ लागले. गावकऱ्यांनी या संदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकारी राहुल कराळे यांना माहिती दिली. त्यानंतर या संदर्भात तहसीलदार यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे हे आगर इथे दाखल झाले. काल रात्री रात्री आठ वाजता एनडीआरएफचे पथक देखील दोन रेस्क्यु बोटद्वारे दाखल झाले.

मोरणा नदीला पूर, अकोल्यात पूर परिस्थिती

नदीला मोठा पूर असल्याने बोट चालवण्यास अनेक अडचणीत येत होत्या. अखेर दीड तासाच्या रेस्क्यूनंतर या ३ वर्षीय आनंदीला रबर बोटीने आगर गावच्या नदीकाठापासून उगवाकडील नदी काठावर आणण्यात आले. त्यानंतर संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाच्या पथकाने तिला ऑक्सिजन लावत अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी घटनास्थळी तहसीलदार सुनील पाटील, ठाकरे शिवसेना पदाधिकारी राहुल कराळे, सचिन बहाकार आणि गावकऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.
घराला पुराचा वेढा, तिघेजण १५ तास पत्र्यावर अडकले, अग्निशमन दलाची प्रयत्नांची शर्थ, एसडीआरएफ पथक आले अन्…
दरम्यान सध्या आनंदीवर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षी मोठा पाऊस झाला की मोरणा नदीला पूर येतो. त्यामुळे उगवा आणि आगर या गावाचा संपर्क तुटतो. गेल्या कित्येक वर्षापासून ही समस्या कायम आहे. अजूनही या समस्येवर लोकप्रतिनिधींनी तोडगा काढला नाही, असेही गावकरी सांगतात. मोरणा नदीवरील पुलाची उंची वाढवण्यात यावी, जेणेकरून ही समस्या पूर्णता निकाली लागेल, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed