भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राच्या हवामानासंदर्भात काही अंदाज व्यक्त केले आहेत. त्यानुसार २० जुलैला ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उद्याही या सर्व ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज सकाळपासून या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात नद्यांना पूर आला आहे. रायगड जिल्हयातील महाड शहरात, तर रत्नागिरीच्या खेडमध्ये नदीचे पाणी शहरात शिरले आहेत. आज रात्रीपर्यंत याठिकाणी पावसाचा जोर कसा राहतो, यावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चिपळूण आणि रायगडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत.
रेल्वे स्थानकांवर गर्दी
सततच्या पावसामुळे मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांना फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक डोंबिवलीपर्यंतच सुरु आहे. त्यापुढे कल्याण ते कसारा ही वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. तर कल्याणपुढील रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. याशिवाय, ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन्स २० मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. यामुळे सीएसएमटी, कुर्ला, दादर या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे. तर दुसरीकडे हार्बर रेल्वे सेवा अर्धा तास उशिराने सुरु आहे. तर पश्चिम रेल्वेमार्गावरील ट्रेन्सही १५ मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत.
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनाही घरी सोडले
मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारे आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफच्या तुकड्या तैनात आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी देखील आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे.