• Thu. Mar 12th, 2026
    Solapur News : फेरीवाल्यांचा संताप अनावर, पोलिसांसोबत आंदोलकांची झटापट; सोलापूर महापालिकेसमोर हायव्होल्टेज ड्रामा

    सोलापुरात फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. सोलापूर महानगरपालिकेसमोर आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली असून, परिस्थिती तणावपूर्ण होती. सीटू संलग्न हॉकर्स युनियनने काढलेल्या या मोर्चात पोलिसांचा बंदोबस्त तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    सोलापूर महानगरपालिकेसमोर फेरीवाल्यांचा मोर्चा, फेरीवाले आणि पोलिसांची झटापट सोलापूर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर : शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला बुधवारी हिंसक वळण लागले. सीटू संलग्न हॉकर्स युनियनने सोलापूर महापालिकेवर धडक दिली असता, आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या फेरीवाल्यांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत मजल मारल्याने महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या रणकंदनामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.शहरातील फळ-भाजी विक्रेते, चारचाकी फेरीवाले, खोकेधारक तसेच जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या पथविक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता.

    सीटूचे राज्य महासचिव एम.एच. शेख आणि राज्य उपाध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता दत्तनगर येथील लाल बावटा कार्यालयापासून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. फेरीवाले आणि सीटूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा पुढे जात महानगरपालिकेसमोर पोहोचताच पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी फेरीवाले, सीटूचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली.

    पोलिस बंदोबस्त तोडण्याचा प्रयत्न

    फेरीवाले आणि सीटूचे कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे महानगरपालिकेकडे येत असताना पोलिसांनी मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना थांबवताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली. काही आंदोलकांनी पोलिसांचा बंदोबस्त तोडून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आंदोलकांनी तेथे जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.

    Maharashtra TimesJalna News : कोचिंग क्लासेसमध्ये टँकरमधून पाणी भरताना विजेचा शॉक लागला, 20 वर्षीय तरुण जागेवर गेला, जालनामधील दुर्दैवी घटना

    पथविक्रेत्यांच्या हक्कांसाठी आंदोलन

    सीटूचे राज्य महासचिव एम.एच. शेख यांनी सांगितले की, केंद्र सरकारने Street Vendors (Protection of Livelihood and Regulation of Street Vending) Act, 2014 तसेच Deendayal Antyodaya Yojana – National Urban Livelihoods Mission अंतर्गत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू केले आहे. या कायद्यानुसार फेरीवाले, हातगाडीधारक आणि पथविक्रेत्यांचे संरक्षण करणे, त्यांना ओळखपत्र देणे तसेच हॉकर्स झोन निश्चित करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे.

    Maharashtra TimesAlibag Panchayat Samiti : तब्बल 6 दशकांनंतर अलिबाग पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा

    या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा