Pune News : एवढ्याशा चेष्टा-मस्करीतून थेट खुनापर्यंत पोहोचलेल्या या घटनेमुळे पुण्यातील कॅम्प परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० मार्च) रात्री सव्वा दहाच्या सुमारास फैसल हा न्यू मोदीखाना मस्जिदजवळ मित्रांसोबत उभा राहून गप्पा मारत होता. त्यावेळी दुचाकीवरून काही तरुण तेथून जात होते. फैसलने त्यातील एकाला चेष्टा-मस्करीत “शब्ब्या” अशी हाक मारली. ही हाक आरोपींच्या जिव्हारी लागली. काही वेळातच ते परत आले आणि “अशी हाक का मारली?” अशी विचारणा करत वाद घालू लागले.
Crime News : ताई मावशीचा जीव घेतला, हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं भासवलं, बॉयफ्रेण्डची टिप आणि मायलेक अडकले
साथीदारांना बोलावून घेतलं
वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी मोबाईलवरून आणखी एका साथीदाराला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी फैसलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीच्या दरम्यान एका आरोपीने चाकू काढून त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या फैसलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र चाकूच्या वारामुळे झालेल्या अंतर्गत रक्तस्त्रावामुळे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
मेसचे दर वाढले तर खर्च भागवायचा कसा? गॅस तुटवड्यामुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेले विद्यार्थी हवालदिल
खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी लष्कर पोलिसांनी अली अब्बास अश्रफअली सय्यद (वय २५, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ), सोहेल युसूफ तांबोळी (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) आणि अश्रफअली गफार सय्यद (वय ५५, रा. म्हाडा कॉलनी, विमाननगर) यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या आणखी तीन साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस करत आहेत.
Mumbai Crime : लग्नाच्या वीस वर्षांनी मूल, सोसायटीत कारच्या धडकेत मुंबईतील चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंब म्हणालं पार्किंग वादातून जीव घेतला
एवढ्याशा चेष्टा-मस्करीतून थेट खुनापर्यंत पोहोचलेल्या या घटनेमुळे कॅम्प परिसरात खळबळ उडाली आहे. क्षणिक राग आणि किरकोळ वाद किती मोठ्या गुन्ह्यात बदलू शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
