जिल्हाभरात खरं पाहिलं तर वन्यजीवांचा अपघाती मृत्यू हा नवीन नाही याआधीही धुळे सोलापूर मार्गावर अशाच प्रकारच्या एका वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू झाला होता. त्याआधी पाण्याच्या शोधात आलेले काळवीट आणि मोर यांचाही श्वानांच्या तावडीत सापडल्याने मृत्यू झाला. बुधवार १९ रोजी सकाळी आठ वाजता लिंबागणेश रोडवर एका चारचाकी वाहनाच्या धडकेत एका वानराचा जागीच मृत्यू झाला आहे.
मात्र, वाहनाची धडकबसल्यानंतर वानर काही वेळ जिवंत होतं. नागरिकांनी धाव घेत या वानराला पाणीदेखील पाजलं मात्र, दुर्दैवाने या वानराला वाचवण्यात अपयश आले. वानराचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी एकत्रित येत या वानराच्या अंत्यविधीसाठी भजनी मंडळ लावत टाळ मृदुंगाच्या गजरात वानराचा गावातील वेशीजवळ असलेल्या हनुमान मंदिराशेजारीच विधिवत अंत्यसंस्कार केला. त्याचबरोबर अंत्यविधी केलेल्या ठिकाणी चांदी पाठाचे रोप लावून एक माणुसकीचा अनोखा संदेश लिंबागणेश ग्रामस्थांनी आज दिला आहे.
मात्र, प्रश्नचिन्ह तसाच उरतो तो म्हणजे वन्य प्राण्यांच्या जीव वाचावा यासाठी केलेले मोठे पाणवठे पावसाळा सुरू झाला तरी कोरडेठाण आहेत. त्यामुळे या वन्यजीवांना वनराई सोडत गाव खेड्यांकडे प्रस्थान करावे लागत आहे. परिणामी रस्ते ओलांडताना भरधाव वाहनांच्या धडकेत त्यांचा मृत्यू होतो हे सत्य टाळता येत नाही. वन्यजीवांचे अपघात रोखण्यासाठी वनविभाग नेमका करतोय काय? हा प्रश्नचिन्ह नागरिकांनी उपस्थित केला आहे.