संशयितांनी खून करणार असल्याची कबुली पोलिसांना दिली. दरम्यान, संशयित आरोपी ज्या युवकाचा खून करणार होते. तो युवक कऱ्हाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आहे.
प्रीतम चंद्रकांत पाटील (वय ३१), सागर अशोक पवार (वय ३५), किरण मोहन पवार ( वय ३१) तिघेही रा. वहागांव ता. कराड, ऋषीकेश अशोक पाटील (वय २२) रा. येणके ता. कराड अशी खुनाच्या कटातील अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, बेलवडे हवेली गावच्या हद्दीत हॉटेल आनंद हे आरोपी प्रीतम चंद्रकांत पाटील (रा. वहागाव, ता. कराड) हे चालवत असतात. त्यांच्या हॉटेलवर दि. ७ जुलै रोजी शिरवडे (ता. कराड) येथील आयुष सुहास बोराटे हा जेवण करण्यासाठी आला होता. यावेळी बोराटे आणि हॉटेल चालक प्रीतम पाटील यांच्यात जेवणाच्या ऑर्डरवरून वाद झाला होता.
त्यावेळी आयुष याने त्याचा भाऊ वेदांत तसेच बाळू यादव यांना बोलावून आनंद हॉटेलची मोडतोड, दुचाकीची मोडतोड करून निघून गेले होते. हा राग मनात धरून हॉटेलचालक प्रीतम तसेच त्याचा मित्र सागर पवार, किरण पवार, ऋषीकेश पाटील यांनी दि. १० जुलै रोजी हॉटेल आनंद येथे एकत्र येऊन आयुष बोराटे याचा खून करण्याचा कट रचला.
यावेळी हॉटेलमध्ये असणारी कुऱ्हाड, चाकू, कोयता घेऊन दुचाकीच्या नंबर प्लेटला राख, माती लावून मुजवली. चौघे त्या दुचाकीवरून शिरवडे येथे गावी जात असताना रात्रगस्त पेट्रोलिंग करणाऱ्या तळबीड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार वाघमारे, चालक पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांना बेलवडे हवेली हद्दीत दि. २१ रोजीच्या मध्यरात्री २ वाजता दिसले. त्यावेळी महिला पोलीस हवादार वाघमारे यांना त्यांचा संशय आल्याने त्यांना थांबण्याचा इशारा केला. यावेळी दुचाकी न थांबवता संशयित भरधाव वेगात निघून गेले.
यावेळी पोलिसांनी दुचाकीसह संशयितांना तासवडे टोलनाक्याच्याजवळ औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या रस्त्यावर पकडले. यावेळी आयुष सुहास बोराटे याचा खून करण्यासाठी जात असल्याची कबुली संशयितांनी दिली. ज्या युवकाचा खून करणार होते. तो युवक कऱ्हाड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुहास बोराटे यांचा मुलगा आहे. या घटनेमुळे कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर महामार्गाच्या कडेला टाकलेली कुऱ्हाड, चाकू, कोयता संशयितानी पोलिसांना दाखवला. त्यायानंतर हस्तगत करून दुचाकी ताब्यात घेतली असून चार संशयितांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे तपास करत आहेत.