बीआरएस पक्षाचं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं पाऊल
बीआरएस पक्षात नगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. या माध्यमातून आता त्यांनी कामाला सुरवात केली आहे. ठिकठिकाणी मेळावे, बैठका होत आहेत. श्रीगोंदा तालुक्यात मात्र शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी जास्तीत जास्त शेतकरी कामे घेऊन येत असतात. त्यामुळे या दिवशी दिवसभर बीआरएसचे पदाधिकारी तहसिलदार कार्यालयालसमोर तंबूची झोपडी उभारून बसणार आहेत.
यासंबंधी भोस यांनी सांगितले की, सध्या विविध कारणांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. राज्यातील राज्यकर्ते आणि प्रशासनाचे त्यांच्याकडे लक्ष नाही. के. सी.आर. यांचा पक्ष हा शेतकऱ्यांच्या हिताचा पक्ष आहे. तेलंगणामध्ये त्यांचे शेतकऱ्यांच्या कामांसंबंधी कडक धोरण आहे. कामे अडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड केला जातो. त्याही पुढे जाऊन कडक कारवाई करण्याचे धोरण तेथे आहे. आपल्या राज्यातही दप्तर दिरंगाई, सेवा हमी कायदा, भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अनेक अडचणींनी सामोरे जावे लागते.
तक्रार कोणाकडे करायची? कोणाची मदत घ्यायची? हे शेतकऱ्यांना कळत नाही. त्यांच्यासमोर पर्यायही नसतो. ही उणीव भरून काढण्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला. तो सतत सुरू राहिल. दर सोमवारी हा उपक्रम होईल. येथील झोपडीत बीआरएसचे पदाधिकारी थांबून शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. सर्व विभागांशी संबंधित तक्रारी आणि कामे यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाईल. विनंती करून कामे झाली नाहीत, तर आंदोलन केले जाईल. आम्ही जशी शेतकऱ्यांना मदत करीत आहोत, तशीच अधिकाऱ्यांनीही करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही भोस यांनी सांगितले.