दुष्काळी जिल्हा
सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षात चांगला पाऊस झाल्याने दुष्काळी जिल्हा हा नाव पुसला गेला असं मानले जात आहे. मात्र यंदाच्या वर्षी पुन्हा तशीच परिस्थितीची पुनरावृत्ती झाली आहे. दीड महिना होत आला तरी पावसाने अक्कलकोट तालुक्यात दांडी मारली आहे. सोलापूर जिल्ह्यात कायम पावसाची हमी सांगता येत नाही. सोलापुरात कधी अतिवृष्टी होते तर कधी दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असतो. पाऊस जास्त झाला तर ओला दुष्काळ पडतो तर पावसाने पाठ फिरविली तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते.
मैंदर्गीकरांची गाढवाच्या लग्नावर श्रद्धा
अक्कलकोट शहरापासून अगदी काही अंतरावर मैंदर्गी गाव आहे. या गावात अनेक वर्षांपासून गाढवाचे लग्न लावून दिले जाते. पाऊस झाला नाही किंवा दुष्काळी परिस्थिती ओढवली तर मैंदर्गीकर हे गाढवाचे लग्न लावून देतात. गाढवाच्या लग्नाची लग्न पत्रिका देखील छापून आजूबाजूच्या ग्रामस्थांना निमंत्रण दिले जाते. ठरलेल्या तारखेला शुभमुहूर्तावर गावातील वेशीत गाढवाचे लग्न लावून वरात काढली जाते.
ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असल्याची माहिती ग्रामस्थ सांगतात. अनेकदा गाढवाच्या लग्नानंतर अक्कलकोट तालुक्यात समाधानकारक पाऊस बरसला आहे. यंदाच्या वर्षी दीड महिना होत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही, खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत, म्हणून ११ जुलै रोजी दुपारच्या शुभमुहूर्तावर गाढवाचे लग्न लावून देण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात गाढवांची वरात काढून मैंदर्गीकरांनी वरुणराजाकडे मुसळधार पावसासाठी साकडे घातले आहे.