आसाम राज्यातील गुवाहाटी जोरहाट येथील २६ वर्षीय तरुणीची लातूर जिल्ह्यातील एका तरुणाशी ओळख झाली. दोघांचं बोलणं वाढलं अन् ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांनी अनेक आणाभाका घेतल्या. सोशल मीडियाच्या आभासी जगातून बाहेर पडत आपल्या स्वप्नातील राजकुमाराला भेटण्यासाठी ती थेट आसामहून मुंबई अन् तिथून लातूर असा रेल्वे प्रवास करत लतूरला पोहोचली. मात्र प्रवासादरम्यान तिचा मोबाइल चोरी गेला. त्यामुळे प्रियकराला संपर्क करणे अवघड झाले. पण तिच्याकडे त्याचा नंबर एका कागदावर लिहिलेला होता. सहप्रवाशांच्या फोनवरून तिने प्रियकराला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण प्रियकराचा संपर्क तुटला. त्याचा फोन बंद येऊ लागला. एक तर अनोळखी शहर, त्यात जवळ असलेले पैसे ही संपले. त्यामुळे ही तरुणी लातूरात फिरू लागली. अंधाराचा आडोसा पाहून आराम करू लागली. ‘मुंबई से गई पुना, पुना से गई दिल्ली, दिल्ली से गई पाटणा, फिर भी ना मिला सजना’, या गीता प्रमाणे तिची गत झाली.
तीन चार दिवस असेच गेल्याने भूक असहाय होऊ लागली. थकून ही तरुणी लातूरमधील बस स्थानकात येऊन बसली. बरीच रात्र झाली. पण ही तरुणी काही कुठे जाईना ही बाब तेथील लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिची विचारपूस केली आणि सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील आणि मुस्तफा सय्यद यांना संपर्क साधला. दोघेही तिथे पोहोचले आणि त्यांनी या तरुणीची विचारपूस करून तिला जवळच असलेल्या गांधी चौक पोलीस ठाण्यात नेले.
निवाऱ्याची सोय नसलेल्या महिलांसाठी वन स्टॉप सेंटरमध्ये निवाऱ्याची सोय केली जाते. सेंटरमध्ये या तरुणीची तीन चार दिवस ठेवण्याची सोय केली. दरम्यान, पोलिसांनी तिच्या प्रियकराला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच या तरुणीच्या भावाशी संपर्क साधून सर्व माहिती दिली अन् तिला परत पाठवण्याची व्यवस्था केली. घरी परत जाण्यासाठी तिचे काउन्सिलिंग केले. सोशल मीडियाचे फायदे अन् त्यातील धोके समजाऊन सांगितले. घरच्यांना विश्वासात घेऊनच आयुष्यातील छोटे मोठे पावले उचलावीत हे समजाऊन सांगण्यात आले. तिही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या धक्क्यातून सावरत घरी परतण्यास तयार झाली. पोलिसांनी तिचे तिकीट काढून देत तिच्या सुरक्षेची काळजी घेत तिला परत पाठवले. तिच्या कुटुंबीयांनी समजून घेऊ तिच्याशी सुसंवाद ठेवावा. जेणेकरून असा प्रकार पुन्हा घडू नये. पण ही जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची आहे. आपली मुले मोबाइलचा वापर किती वेळ कशासाठी करत आहेत? त्यांचे मित्र, सोशल मीडियाची त्यांचं जग कसं आहे? यावरही पालकांनी नजर ठेवावी, असे आवाहन पोलfसांनी केले.