उद्धव ठाकरे यांची राज्याची उपराजधानी नागपुरात काल सभा संपन्न झाली. या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधताना शब्द फिरवणारे देवेंद्रजी नागपूरला लागलेले कलंक आहेत, असा शब्दप्रयोग केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी नागपुरात धुडगूस घातला. तर भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केले. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधून विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
कलंक हा शब्द त्यांना एवढा झोंबला असेल तर त्यांच्याकडून ज्या प्रकाराचा कारभार सुरू आहे, तो महाराष्ट्राला कलंकच आहे. तो कलंक लावणं त्यांनी थांबवावं. कुणालाही भ्रष्ट म्हणणं हा त्या कुटुंबाला लावलेला कलंकच आहे. अनेक कुटुंबांना कलंकित करुन त्यांची समाजात किंमत कमी करून मग तुम्ही त्यांना मंत्री करताय याला काय अर्थ आहे.
कुणाच्या दारात जाण्यापेक्षा घरात जा-पण सुख आणि आनंद घेऊन जा. तळतळाट घेऊन बाहेर पडू नका. जसं अफजलखानाच्या वेळेला धर्मांतर करण्यासाठी घरंदारं लुटली जात होती. उद्ध्वस्त केली जात होती. तसं आता पक्षांतर करा नाहीतर कुटुंबासकट मारले जाल, जेलमध्ये टाकू.. ही अफजलखानाची वृत्ती देशाला आणि राज्याला लावू नका, ही विनंती
सरकार दारोदारी जात आहे पण लोकांची कामं होत नाही. सरकार दारी जाऊन काही उपयोग नाही. त्यापेक्षा लोकांच्या घरात काय आहे हे सरकारने पाहिलं पाहिजे. योजनांचा पाठपुरावा करण्याचा कार्यक्रमच मी लोकांना दिलाय. होऊन जाऊ दे चर्चा असं त्याचं नाव आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. त्या विरोधात लोकांच्या मनात चिड आहे. मला त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मुळीच पटलेलं नाही. लोक मतदानाची वाट बघत आहेत. ते आपला राग मतपेटीतून व्यक्त करतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.