• Sat. Sep 21st, 2024

आता तर रूपाली चाकणकरही बोलल्या; शरद पवारांना केला अडचणीचा सवाल, माझ्याच बाबतीत असं का वागलात?

आता तर रूपाली चाकणकरही बोलल्या; शरद पवारांना केला अडचणीचा सवाल, माझ्याच बाबतीत असं का वागलात?

कोल्हापूर : मी महिला आयोगाची अध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, या कारणाने माझा राजीनामा घेतला. गेली दीड वर्ष मी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते. हा माझ्यावर झालेला अन्याय आहे. आजही माझे आदर्श शरद पवारच आहेत, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या.

‘कार्यकाळ संपेपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष …’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना अजित पवार यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद दिलं. यानंतर त्या आज पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी महिला सुरक्षा आणि झालेल्या कारवाई संदर्भात आढावा घेतला. तसेच काही सूचनाही केल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच कोल्हापुरात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असताना मी यापूर्वी अनेकदा येथे येऊन गेले. मात्र महिला आयोगाची अध्यक्ष आणि पक्षाची महिला अध्यक्ष असताना मी येथे पहिल्यांदाच आले आहे. २०१९ ला पक्षाची महिला अध्यक्ष असताना अडीच वर्ष हा पदभार मोठ्या ताकतीने सांभाळला. मोठ्या संख्येने महिला गोळा केल्या. मात्र कालांतराने काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मला या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र आता अजितदादांनी पुन्हा महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. पूर्वीच्या कामाचा अनुभव आणि आयोगाचा अनुभव चांगल्या पद्धतीने उपयोगी पडेल आणि यामुळे २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रावादीच्या मतदानाचा टक्का वाढलेला असेल आणि तोही राष्ट्रवादीच्या महिला संघटनेमुळे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच दादा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या कामाला गती मिळेल. आणि कार्यकाळ संपेपर्यंत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरच असेल, असेही त्या म्हणाल्या.
Kolhapur News: हसन मुश्रीफांना मंत्रीपद मिळाल्याने नाराजी, नॉट रिचेबल समरजीत घाटगे समोर येणार, पुढची वाट ठरवणार
‘माझ्याच बाबतीत हा अपवादात्मक नियम का लावला गेला?’

तसेच आजही शरद पवार माझे दैवत आहेत. संघटनेमध्ये काम करत असताना मी अनेक पद भूषवले. मी महिला अध्यक्ष असतानाही त्यांनी मला महिला आयोगाची अध्यक्ष केलं. यामुळे पक्षाची ताकत वाढेल. मात्र महिला आयोगाची अध्यक्ष असताना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, असं म्हणून माझा राजीनामा घेतला गेला. घरावर तुळशीपत्र ठेवून वाड्यावर जाऊन लोकांमध्ये जाऊन मी संघटना वाढवली आणि त्यांनी माझा राजीनामा घेतला, असे चाकणकर म्हणाल्या.
कट्टर विरोधक आता एकत्र, एक नवीन अध्याय सुरू! कोल्हापुरात महाडिक, मंडलिक आणि मुश्रीफ फॅक्टर दिसणार
संघटना ही मला घरासारखी आहे. यापूर्वीचे सर्व अध्यक्ष दोन दोन पदावर काम करत होते. मग मला असा वेगळा का नियम लावला गेला? असा सवालही त्यांनी शरद पवार यांना विचारला आहे. गेल्या पंधरा महिन्यात मला पक्षाच्या एकाही कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले नाही. कुठल्याही व्यासपीठावर मला जाता आले नाही. तर गेल्या दीड वर्षात माझं काय चुकलं? हे देखील पक्षातील वरिष्ठ महिला नेत्यांनी मला बोलावून सांगितल नाही, असे म्हणत नाव न घेता त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.

हसन मुश्रीफांनी मुंबईत शपथ घेताच समर्थकांनी गुलाल उधळला

या सर्व गोष्टींमुळे मी अजित दादांसोबत गेले आणि त्यांनी मला महिला प्रदेशाध्यक्ष पद दिले. यामुळे मी पुन्हा पक्षाच्या व्यासपीठावर दिसले. आम्ही पक्ष बदललेला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आणि विचारधारा घेऊनच आम्ही काम करत आहोत, असे ते यावेळी म्हणाले. तसेच दिल्लीमध्ये आज झालेली बैठकीला अजितदादाच योग्य उत्तर देतील, असेही त्या म्हणाल्या.

‘दहा-बारा वर्षांपूर्वीचा आमचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल’

भाजप महिल अध्यक्ष चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याबद्दल वाद हा काय नवा नाही. दोघीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एक संधीही सोडत नाहीत. अगदी उर्फी जावेदच्या मुद्द्यापासून ते राजकीय मुद्द्यापर्यंत. मात्र आता या दोन्ही नेत्या एकत्र आल्याने या दोघी एकत्र काम कसे करणार? असा सवाल प्रत्येकाला येऊ लागला आहे. यावरही चाकणकर यांनी उत्तर दिलं.

आम्ही यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये होतो. यावेळी शिवसेनेच्या महिला नेत्या काँग्रेसच्या महिला नेत्याही होत्या. मात्र या सर्व आम्ही एकत्र असताना कधी काम केलेलं पाहिलं आहे का? नेते एकत्र काम करत असताना आम्ही आमचे विचारधारा आणि कार्यकर्ते घेऊनच काम करतो. त्यांच्या झेंड्याखाली जाऊन आम्ही काम करत नाही. राष्ट्रवादीमध्ये असतानाचा पूर्वी दहा-बारा वर्षांपूर्वीचा आमचा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आला. आणि यामुळे काही जण मज्जा घेत आहेत. तर असे फोटो व्हायरल केल्याने काही जणांचे घर चालत असतील, तर ते चालू द्या असे त्या म्हणाल्या.

‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर यावर चर्चा करू’

दरम्यान, राज्यात दररोज वेगवेगळ्या राजकीय घटना घडत असून आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबतच्या चर्चाही झाल्याचे समोर येत आहे. यावरही त्यांना विचारले. कोणाकडे कसे पाहावे हा प्रश्नच आहे. कोणा कोणाला एकत्र यायचे आणि विचार पुढे घेऊन जायचे आहेत तो त्यांचा प्रश्न आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर यावर चर्चा करू. यामुळे यावर आत्ताच चर्चा करणे योग्य नाही. याबाबतच्या चर्चा त्यांना करू दे, अशी मीश्किल प्रतिक्रिया रूपाली चाकणकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed