• Sat. Sep 21st, 2024

महिला सन्मान योजना आणि अमृत योजनेमुळे…एस. टी. वेगात….!

ByMH LIVE NEWS

Jul 6, 2023
महिला सन्मान योजना आणि अमृत योजनेमुळे…एस. टी. वेगात….!

महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना लोक कल्याणकारी ठरतात… हा आज पर्यंतचा इतिहास आहे. आता यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  75 वर्षाच्या पुढच्या नागरिकांसाठी एस. टी. महामंडळाच्या बसमध्ये अमृत मोफत प्रवास योजना आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत असलेली महिला सन्मान योजना सुरु केली.

लातूर विभागात एस. टी. महामंडळाला अमृत योजनेंतर्गत एप्रिल – 2023 मध्ये 13 लाख 69 हजार 152 एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला त्यातून 607.05 लाख एवढे उत्पन्न मिळाले, तर माहे मे या महिन्यात 15 लाख 3 हजार 949 एवढ्या जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला यातून 688.67 लाख एवढे उत्पन्न झाले. माहे जूनमध्ये 14 लाख 75 हजार 525 एवढे जेष्ठ आणि त्यातून मिळालेले उत्पन्न 707.08 लाख एवढे आहे.

तर महिला सन्मान योजनेंतर्गत प्रवास भाड्यातील 50 टक्के सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात महिला प्रवाशांची संख्या वाढली असून लातूर विभागात एप्रिल -2023 मध्ये 14 लाख 10 हजार 529 एवढ्या महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून 393.16 लाख उत्पन्न मिळाले तर माहे मे महिन्यामध्ये ही महिला प्रवाशांची संख्या वाढून ती 18 लाख 1 हजार 6 हजार 21 झाली त्यातून 564.85 लाख उत्पन्न झाले. माहे जून महिन्यामध्ये हा आकडा 15 लाख 82 हजार 716 एवढ्या महिलांनी प्रवास केला त्यातून 458.98 लाख एवढे उत्पन्न लातूर विभागाला मिळाल्याचे लातूर विभाग नियंत्रक अश्वजीत अशोक जानराव यांनी सांगितले.

या योजनेचा नेमका काय फायदा झाला हे थेट बस स्थानकात जाऊन लाभधारकांना प्रतिक्रिया विचारल्या…

जेष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया

जेष्ठ नागरिकांसाठी एस.टी. महामंडळाने जी सवलत दिली आहे, त्यामुळे मी पंढरपूर येथील विठ्ठलाचे दर्शनासाठी जावू शकलो… तसेच मला सोलापूर येथे नियमित उपचारासाठी दवाखान्यात जाण्यासाठी इतर कोणालाही आर्थिक मदत मागण्याची वेळ आली नाही अशी प्रतिक्रिया पंडित हरीभाऊ मोटाडे, रा. दर्जीबारेगाव ता. रेणापूर जि. लातूर यांनी व्यक्त केली.

 तर लातूर तालुक्यातील सावरगावचे राहिवाशी सुर्यंकांत व्यंकटराव शिंदे म्हणाले, मी एक वारकरी आहे, या प्रवासाची सवलत दिल्यामुळे मला पंढरपूर जाण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील देवदेवस्थान तसेच मुलां-बाळांकडे, पाहूण्यांकडे जाण्यासाठी, महाराज म्हणून मी ही जनसेवा करीत असतो. इतर गावो-गावी जाण्यासाठी चांगली सोय झाली. सरकाने ही जी योजना काढली आहे,ती चांगली असून यातून वयोवृद्धाची सेवा होत आहे. त्यासाठी मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो.

माझं कुटंब हे पुणे येथे राहते..त्याठिकाणी मी एस टी मोफत झाल्यापासून नियमित जातो. तसेच माझ्या मुलींकडे जाण्याची सोय झाली आहे. गावाकडे येण्या-जाण्यासाठी तसेच ज्योतिबा (कोल्हापूर) , पंढरपूरच्या यात्राला जाऊन आलो. या योजनेचा मी पुरेपूर लाभ घेत असल्याची प्रतिक्रिया श्री. निवृत्ती लिंबाजी पाखरे, हासेगाव ता. लातूर यांनी दिली.

महिला सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांच्या प्रतिक्रिया

मला तीन मुली आहेत एक कोल्हापूर, एक मुंबई, आणि एक पुण्यात राहते… त्या तिघीकडे या सवलतीमुळे मी नियमित जाते. ही सवलत दिल्यामुळे अर्ध्या तिकिटात या सर्व ठिकाणी भेटून येते याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया लातूर येथे सिध्देश्वर चौक येथे राहणाऱ्या श्रीमती सुषमा लोखंडे यांनी दिली.

लातूर मध्ये नर्सिंगची शिक्षण घेणाऱ्या प्रिया सुतार बालाजी या विद्यार्थिनीने.. पूर्वी कधी तरी जायचे पण आता या 50 टक्के सवलतीमुळे गावांकडे किंवा पाहुण्यांकडे जात असते. सवलत दिल्याने उर्वरित 50 टक्के रक्कम मी माझ्या शिक्षणासाठी वापरत आहे.

 

दुसऱ्या एक ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्या  श्रीमती सोनाली पंकज कोटेजा म्हणाल्या, मी ज्वेलरीचा उद्योग करते. ज्वेलरी एग्जीबिशनसाठी अहमदनगर, बीड, जालना येथे एस.टी. महामंडळाने 50 टक्के प्रवास सवलत दिल्याने मी जावू शकले. यातून जी 50 टक्के रक्कम बचत होणार आहे, ती मी माझ्या उद्योगात लावत आहे.

‘मी मेमसाब या ठिकाणी काम करीत असते. मला माझ्या आईकडे ( नांदेड जिल्ह्यात )जाण्यासाठी एस.टी. सवलत मिळाल्याने मी आईकडे किमान दोन वेळा जावू शकले. एस.टी. महामंडळाची 50 टक्के सवलत मिळाल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र  शासनाचे आभार मानते” लातूर मध्ये राहणाऱ्या श्रीमती मीना विकास कांबळे यांनी या प्रतिक्रिया दिल्या.

श्रीमती वर्षा शांतीनाथ दुरुगकर, शिरुर अनंतपाळ यांनी मला एस.टी. महामंडळाची 50 टक्के सवलत मिळाल्याने लातूर येथे नियमित दवाखान्यात येवू शकते. त्यामुळे मी वेळेच्या वेळेला दवाखान्यात जावून आरोग्याची काळजी घेवू शकत असल्याची प्रतिक्रिया दिली.

या सर्व प्रतिक्रिया अत्यंत बोलक्या होत्या.महिलांना अर्धे भाडे असल्यामुळे माहेर मुलीकडे जाणे, पाहूणे तसेच छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या महिलांना याचा मोठा लाभ होत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असल्यामुळे दवाखान्यात येण्यासाठी ,देव देवस्थान दर्शनाला जाण्यासाठी आर्थिक भार नसल्यामुळे सोपे झाले आहे. अनेकांनी परवाची पंढरपूरची आषाढी यात्रा बसनी केल्याचे सांगितले. या ज्येष्ठासाठीच्या अमृत मोफत प्रवास योजनेमुळे एस. टी.महामंडळाची प्रवासी वाहतुक बस पूर्ण क्षमतेनी भरून जातात तसेच शासनाकडून मिळणाऱ्या  परताव्यामुळे एस. टी. चे उत्पन्न वाढते आहे. सर्व अर्थानी ह्या योजना लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र आहे.

00000

  –  युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी,

            लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed