• Sat. Sep 21st, 2024
आर्द्रा नक्षत्राने दिली साथ, पेरण्या सात टक्क्यांवर; मात्र आणखी पावसाची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीस मृग नक्षत्रावरील भिस्त निराशाजनक ठरली. पाठोपाठच्या आर्द्रा नक्षत्राने साथ दिल्यानंतर जिल्ह्यात सरासरी ५८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. परिणामी, गेल्या आठवड्यातील पेरण्यांचा आकडा शून्यावरून ७ टक्क्यांपर्यंत पुढे सरकला आहे. चालू आठवड्यात होणाऱ्या पावसावर पुढील पेरण्यांची भिस्त असणार आहे. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस पाऊस सुरू राहिल्याने बळीराजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

गेल्या आठवड्यात पावसाने महिनाभराच्या तुलनेत समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यांसह नदी-नाले आणि जलस्रोतांमध्येही पाण्याच्या प्रमाणात वाढ झाली. सोमवारपासून पावसाने उघडिप दिल्याने पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे महिनाभरापासून खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग आला आहे. इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तालुक्यांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस नसल्याने भातलागवडीस सुरुवात झालेली नाही. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कापूस आणि मका ही पिके वगळता प्रत्यक्ष खरिपाच्या पेरण्या झाल्याच नव्हत्या.

रानभाजी खाल्ल्यानं थेट रुग्णालय गाठावं लागलं, दोन कुटुंबांसोबत घडला धक्कादायक प्रकार, काय घडलं?
या महिन्यात सिन्नर, सुरगाणा, नांदगाव आणि मालेगाव या चारच तालुक्यांमध्ये सुमारे ५८४.९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यानंतर चार दिवस पाऊस झाल्याने सोमवारपर्यंत जिल्ह्यात ११ तालुक्यांमध्ये ४४ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे एकूण लागवडीच्या उद्दिष्टापैकी ६.८८ टक्के क्षेत्रावर पेरण्या करण्यात आल्या आहेत. चार तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा खरीपाच्या पेरण्यांसाठी जिल्ह्यात यंदा ६ लाख ४३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ४४ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावर पेरणीची नोंद करण्यात आली आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी या चार तालुक्यांचा अपवाद वगळता इतर ११ तालुक्यांमध्ये पेरण्यांनी गती घेतली आहे. मात्र, अपवाद असलेल्या तालुक्यांमध्ये सातत्याने पावसाची हजेरी असल्याने भात व इतर खरिप पिकांच्या लागवडीत अडसर येत आहे.

मालेगावात खोळंबल्या पेरण्या

शहर व तालुक्यात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, ९५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण अवघे ११ टक्के आहे. पावसाअभावी अद्याप ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली नाही.

नाशिककरांना पुन्हा डेंग्यूचा डंख; रुग्णसंख्येने ओलांडली शंभरी, कशी घ्याल काळजी?
तालुक्यात आत्तापर्यंत सर्व महसूल मंडळेमिळून ८५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बागायती क्षेत्र वगळता इतरत्र पेरण्या खोळंबल्या आहेत. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक ९ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. तालुक्यात मक्याचे सर्वाधिक ३८ हजार ८५०२ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून, पावसाने दडी मारल्याने केवळ ३५० हेक्टरवर म्हणजेच एक टक्का पेरणी झाली आहे. असेच चित्र बाजरीचेही आहे.

सर्वाधिक ११० मिमी पावसाची नोंद निमगाव मंडळात झाली असून, सर्वात कमी २४ मिमी पाऊस झोडगेत झाला. जळगाव नि., डोंगराळे, करंजगव्हाण मंडळातही १०० मिमी असा समाधानकारक पाऊस झाला. या तुलनेत मालेगाव, दाभाडी, अजंग, वडनेर, सौंदाणे, सायने शिवारात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेला दीड महिना पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या झोडगेसह माळमाथा परिसरात बुधवारी (दि. ५) दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारच्या सुमारास सुमारे तासभर पावसाने झोडपले.

तालुका अपेक्षित लागवड क्षेत्र प्रत्यक्ष झालेल्या पेरण्या टक्के
मालेगाव ९५,२७८ १०,३२३ १०.८३
बागलाण ६३,९८५ ४१९ ०.६५
कळवण ४१,०२१ ८४३ २.०६
देवळा ३०,१७५.२३ ४,५७९ १५.१७
नांदगाव ६०,४६८.८१ ३,६३५ ६.०१
सुरगाणा ३१,४३९.५८ २३३.५ ०.७४
नाशिक १२,४१४.०५ ००
त्र्यंबकेश्वर २४,११८.०३ ००
दिंडोरी १७,९६८.१९ ००
इगतपुरी ३३,०५३.४४ ००
पेठ २७,४४९.४ ५९ ०.२१
निफाड ३२,७६२.०५ १२ ०.०४
सिन्नर ६२,११३.९३ ०.०१
येवला ७०,१३५.०२ २३५२४.७ ३३.५४
चांदवड ४०,९४४.१५ ६३५ १.५५
एकूण ६,४३,३२५.९ ४४,२६८.२ ६.८८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed