• Sat. Sep 21st, 2024

नाशिक झेडपीत वातावरण तापलं; एका झटक्यात ३ ग्रामसेवक बडतर्फ; ८ जणांवर कारवाई, काय कारण?

नाशिक झेडपीत वातावरण तापलं; एका झटक्यात ३ ग्रामसेवक बडतर्फ; ८ जणांवर कारवाई, काय कारण?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यातील तीन ग्रामसेवकांना बडतर्फ करण्यात आले आहे, तर इतर आठ ग्रामसेवकांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केली आहे. ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमितता, विनापरवानगी गैरहजर राहणे, अभिलेखे उपलब्ध करून न देणे व आनुषंगिक दोषारोपांमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

जून महिन्यात नाशिक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार आशिमा मित्तल यांनी ८ जून २०२३ रोजी संबंधित सर्व ग्रामसेवक यांची सुनावणी घेतली. त्यात एकूण ११ ग्रामसेवकांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. दोन ग्रामसेवकांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली असून, तीन ग्रामसेवकांबाबत फेरचौकशीचे आदेश देण्यात आले.

विविध कामांमधील अनियमितता, गैरहजेरी, मुख्यालयी न राहणे, कार्यालयीन आदेशांचे पालन न करणे, लाच स्वीकारल्याबद्दल गुन्हा, ग्रामपंचायतीचे दफ्तर उपलब्ध करून न देणे, अशा विविध कारणांवर बोट ठेवत जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली. हेमराज गावित (निळगव्हाण,मालेगाव), सतीश मोरे (कौळाणे, मालेगाव), नीलेशसिंग चव्हाण (वासाळी, इगतपुरी), सुभाष गायकवाड (टाकेहर्ष, त्र्यंबकेश्वर), जयदीप ठाकरे ग्रामपंचायत (दुगाव, चांदवड), परशराम फडवळ (चिचोंडी, येवला), शशिकांत बेडसे (वडगाव पंगु, सिन्नर), माधव सूर्यवंशी (कुरुंगवाडी, इगतपुरी), देवेंद्र सोनवणे (पळासदरे, मालेगाव), नरेंद्र शिरसाठ (म्हाळसाकोरे, निफाड) या ग्रामसेवकांवर नियमांनुसार कारवाई करण्यात आली.

विजय अहिरे (टाकेहर्ष, त्र्यंबकेश्वर) येथे कार्यरत असताना त्यांच्याविरोधात दोषारोप सिद्ध झाले. तथापि, त्यांचा खुलासा मान्य करून त्यांना शिक्षा न करता त्यांची विभागीय चौकशी बंद करण्यात आली. उल्हास कोळी (वरसविहिर, त्र्यंबकेश्वर) यांच्याविरुध्दच्या दोषारोपास त्यांनी दिलेला खुलासा मान्य करून विभागीय चौकशी बंद करण्यात आली. अमोल धात्रक (मळगाव, नांदगाव) यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देशित करण्यात आले. सुरेश पवार (उम्रद, पेठ) यांना सर्व कामांची व कागदपत्रांची पाहणी करून मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले. ज्ञानोबा रणेर (सोनारी शिवडे, सिन्नर) यांना सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांची दफ्तर तपासणी गट विकास अधिकारी, सिन्नर यांच्यामार्फत करण्याचे निर्देशित करण्यात आले.
लाच घेण्याची तयारी झाली, पण शंकेची पाल चुकचुकली अन्… निलेश अपार यांची ACB चौकशी
जून २०२३ या महिन्यात विभागीय चौकशीच्या १६ प्रकरणांवर कार्यवाही करून त्यात ११ ग्रामसेवकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. यातून दोन ग्रामसेवकांना दोषमुक्त करण्यात आले, तर तीन ग्रामसेवकांच्या कामकाजाबाबत फेरचौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आणि सीईओ आशिमा मित्तल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed