‘एमआयएम’ने प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार मंगळवारी भडकल गेट येथे आंदोलन केले. राज्यात शिवसेना (शिंदे) आणि भाजपबरोबर सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यासह अन्य पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी झाले. हे ईडी सरकार असल्याची टीका खासदार जलील यांनी केली होती. या विरोधात उपहासात्मक आंदोलन पुकारले होते. एमआयएमच्या आंदोलनाची माहिती व्हॉटसअपवर आयजे ग्रुप, एमपी ग्रुप, ओन्ली पोस्ट होल्डर ग्रुप या तिन ग्रुपवर पाठविण्यात आली होती. भडकल गेट येथे मंगळवारी हे आंदोलन झाले. त्यात अनेक पदाधिकारी व माजी नगरसेवक गायब होते. आंदोलन संपल्यानंतर आलेल्या कार्यकर्त्यांची नावे आणि पदाधिकाऱ्यांची नावे घेण्यात आली. आंदोलनात अनुपस्थिती असलेल्या पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या विरोधात कारवाईचे आदेश खासदार जलील यांनी दिले.
निलंबित केलेल्यांची नावे
सय्यद सलीमोद्दीन सहारा, रफीक खान (चित्ता), गंगाधर ढगे, सुभाष वाघुले, डॉ. अफजल, अरूण भाऊ बोर्डे, मिर हिदायत अली, गाजी साद्दोद्दीन, सिराज पटेल, शोहेब पटेल, मुज्जमिल शेख, विखार भिस्ती, शेख इरफान जहागिरदार, सय्यद हारूण, खान रमीज राजा, राजू चौधरी, हारूण भाई, असद शेख, अन्वर शहा, वसीम तन्वीर, सलमान खान.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या विविध आंदोलन, बैठक आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहभागी व्हावे, याबाबत वारंवार सूचना देण्यात आली आहे. मात्र, तरीही आंदोलनाला गैरहजर राहिलेल्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे पक्षाची शिस्त ही महत्त्वाची असून पक्ष शिस्त न राखणाऱ्यासोबत आगामी काळात अशीच कारवाई केली जाईल. काही निलंबितांनी त्यांची कारणे सादर केली आहेत. त्यांचाही योग्य तो विचार केला जाईल.-शारेख नक्षबंदी, शहर अध्यक्ष, एमआयएम