काय घडलं?
रात्री उशिरा रस्त्यावर कॉफी पिणे, हा अत्यंत गंभीर गुन्हा असल्याचे दर्शवून अचानक पोलिसांनी सुरू केलेल्या या मारहाणीत दोन्ही पायांची शस्त्रक्रिया झालेला एक तरुण वाचला नाही.
काही दिवसांपूर्वी शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका होत आहे. या गुन्ह्यांना रोखण्यात अपयश आल्याचा ठपका पोलिसांवर ठेवला जात आहे. मात्र, वाढते गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी पोलिस सर्वसामान्यांवरती दमदाटी करून मारहाण करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभावेळी पोलिसांनी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व पत्रकारांची अडवणूक करून त्यांना दमदाटी केली होती. मंगळवारी रात्री कॅफे पॅराडाइजच्या बाहेरील तरुणांना विनाकारण पोलिसांचा प्रसाद मिळाला. रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान पुणे शहरात नागरिकांनी फिरणे काही नवीन नाही. या काळात शहरात अनेक रेस्तराँ, हॉटेल, कॉफी स्पॉट सुरू असतात. आबालवृद्धांसह अनेक जण त्याचा आस्वाद घेतात. आता दररोज पोलिस या सगळ्यांना मारहाण करत सुटणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मंगळवारी टी-शर्ट, जीन्समधील या पोलिसांनी केवळ नागरिकांना मारहाणच केली नाही तर आसपासच्या परिसरातील हॉटेलचालकांच्या मालाची तोडफोड करत त्याचे नुकसानही केल्याचे काही हॉटेल चालकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. प्रत्यक्ष गुन्हे करणाऱ्यांना ‘मोकाट’ सोडून सामान्यांवर काठी उगारून, त्यांनी कष्टाने उभारलेल्या व्यवसायाची तोडफोड करून पोलिसांना नेमके काय सिद्ध करायचे आहे, अशीही विचारणा सामान्यांकडून होत आहे.
ट्विटरवर पोलिसांकडून प्रतिसाद
मंगळवारी ही घटना घडल्यानंतर तातडीने संबंधित तरुणाने ट्विटरवर पुणे पोलिसांना ट्विट करत या प्रकाराची माहिती दिली. यावर बुधवारी सकाळी पुणे पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला. तक्रारीची दखल घेतली असून, आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, असा दावा पुणे पोलिसांकडून करण्यात आला आहे.
रात्री ११.४० वाजता चार-पाच वर्दीत नसलेले पोलिस येतात. काहीही स्पष्टीकरण न विचारता थेट मारायला सुरुवात करतात. ही पोलिसगिरी आहे, की दादागिरी आहे? अशा घटनांमुळे सर्वसामान्यांना पोलिसांचा कधीच आधार वाटणार नाही.- सोहम केळकर,मारहाण झालेला तरुण