• Sat. Sep 21st, 2024

आम्हीही बंड केलंय, त्यांची मंत्रिपदं काढा-आम्हाला द्या, आमदारांच्या मागणीने शिंदेंपुढे संकट!

आम्हीही बंड केलंय, त्यांची मंत्रिपदं काढा-आम्हाला द्या, आमदारांच्या मागणीने शिंदेंपुढे संकट!

मुंबई : राष्ट्रवादीचे पॉवरफुल्ल नेते अजित पवार यांनी पक्षातील ‘दादा’ नेत्यांना सोबत घेऊन महायुतीत एन्ट्री केल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांची धाकधुक वाढली आहे. वर्षभर मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मात्र अजितदादांसाठी ९ मंत्र्यांचा लगोलग विस्तार झाल्याने शिंदे गटातील आमदार चिडले आहेत. दादांच्या एन्ट्रीने शिवसेनेतल्या नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. सत्तेत सहभागी झालो, याचा अर्थ सत्तेतला वाटा हवा. जर सरकारमध्ये असून सत्तेचा उपभोग घेता आला नाही तर त्याचा उपयोग काय? असा सवाल विचारत ज्यांना तुम्ही मंत्री केलं, त्यांची मंत्रिपदं काढा आणि आम्हाला मंत्री करा, अशी मागणी शिवसेनेच्या नाराज आमदारांच्या गटाने मुख्यमंत्री शिंदेंकडे केल्याची माहिती आहे. तसा सूर शिंदेंच्या नाराज आमदारांमध्ये आहे. त्यामुळे नाराज आमदारांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आहे.

सत्तेचा वाटाच जर मिळणार नसेल तर सत्तेचा फायदा काय? असा सवाल शिंदे गटाचे नाराज आमदार बैठकीत विचारत आहेत. दादांची महायुतीत एन्ट्री झाल्यापासून शिंदे गटाच्या आमदारांची मोठी गोची झालीये. सांगताही येईना-बोलताही येईना अशी त्यांची अवस्था झाली आहे. पण अशाही परिस्थितीत संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना नाराजीला मोकळी वाट करुन दिलीये. दुसरीकडे अजित पवार निधी वाटपात दुजाभाव करतात, असा आरोप करुन सेना आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्या आरोपांचं आता काय होणार? याचंही टेन्शन शिंदेंच्या आमदारांना आहे.

काहीही सहन करेन, माझ्या आईबापाचा नाद करायचा नाय, सुप्रिया सुळेंचा दादांना इशारा
संजय शिरसाट म्हणाले, आधी दोन पक्षांची युती झाली होती. पण राष्ट्रवादी तिसरा पक्ष अचानक सत्तेत आला. तेव्हा त्यांनाही सत्तेचा वाटा देणं गरजेचं आहे. तो वाटा त्यांना दिलेला आहे. पण सत्तेचा वाटा त्यांना लगोलग दिल्याने आमदारांमध्ये नाराजी आहे. शेवटी सत्ता ही कशासाठी हवी असते तर लोकांची कामे करण्यासाठी मग सत्तेत असूनही लोकांची कामे करण्यासाठी अडचणी येत असतील तर त्याचा काय उपयोग? असा रोकडा सवालही शिरसाट यांनी विचारला.

राष्ट्रवादी सोबत यायला नको होती, असं नाही. राष्ट्रवादी सोबत आल्याने आमची ताकद नक्कीच वाढली आहे. ही वाढलेली ताकद लोकसभेमध्ये नक्कीच दिसेल, येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल. शेवटी राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिलाय. त्यांनाही काहीतरी अपेक्षा असेलच की… असंही सांगायला संजय शिरसाठ विसरले नाहीत.

नेत्यांची गर्दी कमी झालीये, कोल्हेसाहेब आता तुम्हाला संधी, जयंतरावांची पवारांसमोरच मोठी घोषणा
शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक

नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेना आमदारांची मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी का करुन घेतलं, याचं महत्त्व ते आमदारांना सांगतील तसेच नाराज आमदारांची समजूत काढण्याचा ते प्रयत्न करतील. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा शब्द देऊन मुख्यमंत्री नाराज आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न करतील.

तुम्ही थांबणार आहात की नाही? हट्ट कशाला? राजीनामा परत घ्यायचा होता तर दिला कशाला? दादांचा सवाल
बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं स्वागत करुन ते तडकाफडकी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. नाराज आमदारांची चर्चा त्यांच्या कानावर आल्याने त्यांनी तातडीने मुंबईकडे धूम ठोकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed