• Sat. Sep 21st, 2024

इशारा देणाऱ्या जयंतरावांचा कंडका, आव्हाडांनाही आव्हान, दोघांना अपात्र करा, अजितदादांचं पत्र

इशारा देणाऱ्या जयंतरावांचा कंडका, आव्हाडांनाही आव्हान, दोघांना अपात्र करा, अजितदादांचं पत्र

मुंबई : अजित पवार यांच्या साथीला गेलेल्या आमदारांना कारवाईचा इशारा दिलेल्या शरद पवार आणि त्यांच्या साथीदारांना अजित पवार यांनीच आरसा दाखवलाय. आम्हाला निलंबनाच्या किंवा अपात्रतेच्या नोटीसा पाठविण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आम्हीच पक्ष आहोत. उलट आम्हीच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्र दिलेलं आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीये.

शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडून ९ आमदारांवर कारवाई करण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्या संदर्भात अजित पवार यांच्या गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्र दिल्याची माहिती स्वतः अजित पवार यांनी दिलेली आहे तसेच हे पत्र सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी माध्यमांना देखील दाखवलं.

पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी तसेच पक्ष आदेशाच्या विरोधात जाऊन वेगळी भूमिका घेतल्याने ९ आमदारांच्या विरोधात शरद पवार आणि जयंत पाटील यांनी कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिले होते. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या हकालपट्टीचे ट्विटही पवारांनी केले. याच पार्श्वभूमीवर आमदारांमध्ये घबराट निर्माण होऊ नये तसेच आमदारांची चलबिचल होऊन त्यांनी पुन्हा माघारी फिरु नये, यासाठी अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना माझ्या सोबत येण्याच्या भूमिकेने आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, याची मी काळजी घेईन, असा शब्द आमदारांना दिला.

अजित पवारांचा शपथविधी अन् पडद्यामागच्या घडामोडी, पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं सविस्तर विश्लेषण

शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर अजित पवार यांनी पुढचं पाऊल टाकलंय. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. आजच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा हँडओव्हर तटकरे यांना द्यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केली आहे. अजित पवारांच्या गटाकडून महिला प्रदेश अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, प्रदेश प्रवक्तेपदी अमोल मिटकरी, प्रतोदपदी अनिल पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुरज चव्हाण यांची निवड करण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed