राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार हे आज सातारा व कराड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. यावेळी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, शशिकांत शिंदे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यामध्ये पुढील तीन-चार महिन्यांत राज्यव्यापी दौरा करून सर्वसामान्य माणूस मतदार आणि लोकांमध्ये जाऊन पक्ष उभा केला जाईल. आम्ही लोकांनी कष्ट केले. या सगळ्या तरुणांना योग्य दिशा दिली, कार्यक्रम दिला तर माझी खात्री आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीला अनुकूल चित्र दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, त्यांना अपात्र करायचं की नाही याचा विचार मी करणार नाही. तो विचार जयंत पाटील व त्यांचे सहकारी करतील. मी कुणाबद्दल नाराजी व्यक्त करत नाही. काही सहकाऱ्यांनी जे केलं ते योग्य नाही. मात्र, त्यासाठी मी मनात द्वेष ठेवून राजकारण करत नाही. त्यांनी जर भेटायची वेळ मागितली, तर विचार करु, असं म्हणत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परतीची संधी खुली असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.
देशात आणीबाणी जाहीर झाली, तेव्हा देशातील अनेक राजकीय पक्षांनी, माध्यमांनी इंदिरा गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्या काळात इंदिरा गांधींची भूमिका योग्य आहे असं म्हणणारा एकच पक्ष आणि नेता होता. नेत्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आणि पक्षाचं नाव शिवसेना. त्यानंतर जी निवडणूक झाली, त्यात शिवसेना हा एकच पक्ष होता ज्यानं एकही उमेदवार उभा केला नाही आणि इंदिरा काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे आत्ता आम्ही वेगळं काही करतोय असं नव्हे, असेही पवार म्हणाले.