पुणे-नाशिक मार्गावर आता शिवशाही बरोबरच आरामदायी असलेल्या व्होल्वोच्या दहा बस शिवाजीनगर (वाकडेवाडी) येथून धावणार आहेत. या बस जनशिवनेरी नावाने चालणार आहेत. पुणे- मुंबई (दादर) मार्गावर ई-शिवनेरी सुरू झाल्यामुळे त्या मार्गावरील शिवनेरी बस नाशिकसाठी सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांची सोय झाली आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावरून दादर, बोरिवली, ठाणे मार्गावर व्होल्वो शिवनेरी बसच्या माध्यमातून सेवा दिली जात होती. पण, काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस दाखल झाल्या आहेत. सध्या मुंबईसाठी स्वारगेट येथून ३० ई-शिवनेरी बस धावत आहेत. मुंबईसाठी ई-शिवनेरी बस सुरू झाल्यामुळे त्या मार्गावरील व्होल्वोच्या शिवनेरी बस बसून आहेत. त्यापैकी आठ वर्षे पूर्ण झालेल्या शिवनेरी बस पुणे-नाशिक मार्गावर एक जुलैपासून शिवाजीनगर येथून जनशिवनेरी नावाने धावण्यास सुरूवात झाली आहे.
नाशिकसाठी तासाला जनशिवनेरी
पुणे नाशिक मार्गावर जनशिवनेरीच्या दहा बस धावणार आहेत. प्रत्येक तासाला शिवाजीनगर येथून नाशिकसाठी जनशिवनेरीची बस असणार आहे. शिवाजीनगर येथून सकाळी सहा वाजता पहिली जनशिवनेरी असणार आहे. तर, रात्री उशीरा नऊ वाजता नाशिकसाठी जनशिवनेरी सुटणार आहे. जनशिवनेरी बस पूर्णपणे वातानुकूलीत असणार आहे. या बसला एका प्रवाशासाठी ५०० रुपये तर अर्धे २५५ रुपये एवढे तिकीट असणार आहे, अशी माहिती शिवाजीनगर एसटी आगाराचे प्रमुख ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली.