मी शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं विधान आमदार बाळासाहेब पाटील यांनी केलं. तर उद्या शरद पवारांच्या दौऱ्यात मी माझी भूमिका आणखी स्पष्ट करणार आहे, असं बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं.
कराड उत्तर हा सातारा जिल्ह्यातील मह्त्वाचा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व यशवंतराव चव्हाण, केशवराव पवार, पी.डी.पाटील यांच्या सारख्या दिग्गजांनी केले आहे. आमदार बााळासाहेब पाटील यांनी सलग पाच टर्म या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ पाच वेळा प्रतिनिधीत्व करत आहेत.
२००९ ला विधनासभा मतदारसंघाच्या पुनर्रचना झाली होती. त्यावेळी २००९ साली तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांचा पाठींबा असलेले अतुल भोसले यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी नाकारली. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे बाळासाहेब पाटील यांना अपक्ष निवडणूक लढावी लागली होती. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी विजय मिळवत अतुल भोसलेंना पराभवाची धूळ चारली होती. आज तेच बाळासाहेब पाटील सर्वात पहिल्यांदा शरद पवारांच्या समर्थनार्थ पुढं आले आहेत.
दरम्यान, साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर आमदार नेमके कुणासोबत आहेत यासंदर्भातील भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे आमदार दीपक चव्हाण आणि मकरंद पाटील हे अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतात अशी शक्यता आहे. दुसरीकडे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या सातारा दौऱ्यावर आहेत.