कौशल्य विकासासाठी राज्यात स्किल सेंटर; दरवर्षी ३५ हजार युवकांना प्रशिक्षण – मंत्री डॉ. उदय सामंत
महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात अव्वल
मुंबई, दि. १६ : राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रयत्न करण्यात असून त्यामुळे महाराष्ट्राने परकीय गुंतवणुकीत देशात पहिले स्थान कायम राखले आहे. राज्यातील युवकांना उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. या अंतर्गत टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने राज्यात स्किल सेंटर उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे ३५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम २६० अन्वये प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, दावोस परिषदेत राज्य सरकारने विविध उद्योगांशी मोठ्या प्रमाणावर सामंजस्य करार केले आहेत. २०२२ मध्ये ८०,५८८ कोटी २०२३ मध्ये १,३७,३९३ कोटी २०२४ मध्ये ३,१६,७३९ कोटी २०२५ मध्ये १२,२३,०८१ कोटी २०२६ मध्ये ३१,२५,८८२ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून त्यापैकी उद्योग विभागाचे ६७ करार सुमारे १५,१५,१८२ कोटी रुपयांचे आहेत.या करारांपैकी सुमारे ७० ते ७५ टक्के गुंतवणूक परकीय गुंतवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दावोस करारांवर ‘भगवी पत्रिका’ लवकरच
दावोस येथे झालेल्या सामंजस्य करारांबाबत राज्य सरकार लवकरच ‘भगवी पत्रिका’ सादर करणार आहे. या पत्रिकेत २०२२ ते २०२५ दरम्यान झालेल्या करारांची अंमलबजावणी, किती प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित झाले, किती प्रकल्प प्रक्रियेत आहेत तसेच कोणते प्रकल्प प्रलंबित किंवा मागे आहेत, याचा सविस्तर तपशील मांडण्यात येणार आहे.
गडचिरोलीमध्ये मोठा स्टील हब
गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड परिसरात १.२५ लाख कोटी रुपयांची स्टील उद्योग गुंतवणूक होत आहे. त्यामुळे गडचिरोली भविष्यात मोठे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होईल आणि स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचा उपक्रम
राज्यातील स्थानिक उद्योजकांना संधी देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदांचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून १,२७,३२२ कोटी रुपयांचे करार करण्यात आले असून सुमारे १ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अलीकडेच ४४,७१० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून त्यातून सुमारे ३० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
कौशल्य विकासासाठी स्किल सेंटर
राज्यातील युवकांना उद्योगांसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. या अंतर्गत टाटा टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने राज्यात स्किल सेंटर उभारण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ९५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असून राज्यातील विविध ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्किल सेंटर उभारले जात आहेत. या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे ३५ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उद्योग विभाग उद्योग आणण्याबरोबरच रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा उभारणीवरही भर देत आहे. भविष्यातही महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात अव्वल राहील, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले.
00000
शैलजा पाटिल/ वि.सं.अ
