त्यानंतर सध्या राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका, अजित पवार, शपथ घेतलेले आमदार आणि अजित पवारांना पाठिंबा दिलेल्या आमदारांबाबत स्पष्ट मत मांडलं. तसेच, त्यांनी वर्षभरापूर्वी अजित पवारांना दिलेल्या ऑफरबद्दलही सांगितलं.
वर्षापूर्वी अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष व्हा म्हटलेलं : जयंत पाटील
गेल्या वर्षी अजित पवार विरोधी पक्ष नेते झाले तेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो, तुम्ही प्रदेशाध्यक्ष व्हा असं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांना विरोधी पक्षनेता व्हायचं होतं. भुजबळ, हसन मश्रीफ यांनी मला पक्षाचं काम बघायला सांगितलं. अजित पवारांना विरोधी पक्षनेते व्हावं असं भुजबळ आणि मुश्रीफ यांना वाटतं होतं.
सर्व आमदारांना मी दोष देणार नाही – जयंत पाटील
ज्या ९ सदस्यांनी शपथ घेतली आहे, त्यांनी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन पाऊल टाकले आहे. उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही. त्यांनी कशावर सह्या केल्या असतील तर त्यामधील बरेसचे आमदार आज आमच्या संपर्कात आहेत. अनेकजण शरद पवार यांना जाऊन भेटत आहेत. मलाही दिवसभरात बऱ्याच आमदारांचे फोन आले. गेल्या दोन तासांमध्ये बरेच आमदार आमच्याशी बोलले. त्यामुळे मला पत्रकार परिषद घ्यायला वेळ लागला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
ज्यांनी सह्या केल्या त्या सर्वांची नक्की भूमिका काय आहे, हे समोर आल्यावर आम्हाला विचार करावा लागेल. काही आमदारांनी असं सांगितलं की, आम्ही तिथे (राजभवनात) गेलो, आम्हाला सह्या करायला सांगितल्या, कशावर सह्या करतोय, हेदेखील दाखवण्यात आले नाही. आम्हाला सह्या कराव्या लागल्या. कशावर सह्या केल्या हे माहिती नाही, सांगणारे दोन-तीन आमदार मला भेटले, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी शरद पवारांसोबतच – जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यात शरद पवार यांच्यासोबत राहणार आहे, असं मी स्पष्ट करतो, असं जयंत पाटील म्हणाले. काही विधानसभेच्या सदस्यांनी पक्षाच्या मान्यतेशिवाय सत्तापक्षाकडे जाऊन शपथविधीचा कार्यक्रम झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते व्यथित होऊन झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत. महाराष्ट्रातील कार्यकर्ते एकसंधपणे शरद पवारांसोबत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.