मुंबई महापालिका क्षेत्रात एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत
शासनाकडील देय रक्कम महापालिकेस टप्प्याटप्प्याने देणार
मुंबई, दि .१६ : मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी शासन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असून मुंबई महापालिकेस शासनाकडून देय असलेली देय रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य सुनिल शिंदे यांनी या विषयी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत ॲड. अनिल परब, जगन्नाथ अभ्यंकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, मुंबईत पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असून यामध्ये कोस्टल रोड, शहरातील पूल, रस्ते व नद्यांचे पुनरुज्जीवन, मिठी नदी सुधारणा, एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प, स्ट्राँग वॉटर ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यासारखे महत्त्वाचे प्रकल्प मुंबई शहरात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री डॉ. सामंत म्हणाले, प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुंबई महापालिकेस देय असलेल्या निधीबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल. मुंबई महापालिकेस आरटीई अंतर्गत देय असलेला ८६ कोटी रुपयांचा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. तसेच विविध विभागाकडून मुंबई महापालिकेस देय असलेला १० हजार ९३१ कोटी रुपयांचा निधी टप्याटप्याने दिला जाईल, असेही उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी या प्रश्नाच्या
मुंबई महापालिकेचे आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगत, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, महापालिकेचे काही भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यातून महापलिकेला अधिकचा महसूल मिळणार असल्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
००००
एकनाथ पोवार/ स.सं
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार -मंत्री डॉ. उदय सामंत
मुंबई, दि. १६ : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाचे ८३ टक्के काम झाले असून उर्वरित कामे पूर्ण करून डिसेंबर २०२६ अखेर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला.
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पर्यावरण विभागाच्या परवानग्या, स्थानिक पातळीवरील अडचणी तसेच जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्यात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला.
तथापि, प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. पूर्वी काही भागांमध्ये नागरिकांना १० ते १२ दिवसांनी पाणी मिळत होते, मात्र सध्या पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेबाबत शासन सकारात्मक असून महानगरपालिकेच्या स्वहिश्याचा निधी कर्जस्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाकडूनही प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जात असल्याचे मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
0000
शैलजा पाटील/ वि.स.अ
अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाईसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार – मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई, दि. १६ : राज्यातील अनधिकृत आणि विनानोंदणी सुरू असलेल्या नर्सिंग होमवर कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य भाई जगताप, संजय खोडके, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम, १९४९ तसेच संबंधित नियमांनुसार राज्यात खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमची नोंदणी व तपासणी केली जाते. मात्र काही ठिकाणी विनानोंदणी किंवा अनधिकृत नर्सिंग होम सुरू असल्याच्या तक्रारी येत असल्याने या प्रकरणावर राज्यस्तरावर समन्वयाने कारवाई करण्याची गरज आहे.
यासाठी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आणि आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव यांच्या सहअध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीत विभागीय आयुक्त, पोलीस अधिकारी तसेच आवश्यक ते इतर अधिकारीही सहभागी असतील. ही समिती राज्यातील सर्व नर्सिंग होमचा आढावा घेऊन अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाई करेल आणि संपूर्ण अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर मांडेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
सध्याच्या कायद्यातील तरतुदींमध्ये दंड आणि शिक्षा मर्यादित असल्याने ती अपुरी ठरत आहे. त्यामुळे कठोर कारवाईसाठी संबंधित कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्याचाही प्रस्ताव समितीमार्फत तयार करण्यात येईल
याशिवाय मुंबई महानगरपालिकेलाही सर्वेक्षण करून अनधिकृत नर्सिंग होमची माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. राज्यातील रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अनधिकृत नर्सिंग होमवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ही समिती ९० दिवसांत अहवाल सादर करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००००
शैलजा पाटील/ वि.स.अ
लाड-पागे समितीची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यात निकाली काढण्याचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश – मंत्री डॉ.उदय सामंत
मुंबई, दि. १६ : सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या नोकरीसंदर्भातील लाड-पागे समितीची प्रलंबित प्रकरणे सहा महिन्यांच्या आत निकाली काढावीत, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री डॉ.उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. तसेच राज्यातील सफाई कामगारांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी तसेच लाड-पागे समितीच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याबाबत सदस्य उमा खापरे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य निरंजन डावखरे, सचिन अहिर, सदाभाऊ खोत, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार अनेक ठिकाणी भरती करण्यात आली आहे. काही महानगरपालिका व नगरपरिषदांनी या शिफारसींची प्रभावी अंमलबजावणी केली असली तरी काही ठिकाणी अद्याप अडचणी आहेत. लाड-पागे समितीनुसार वारसा हक्काने नोकरी देताना संबंधित उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन नियुक्ती देण्याबाबत शासनाने जीआर काढला आहे. मात्र अनेकदा उमेदवार उच्च शिक्षित असल्याने त्यांना त्याच पदावर नियुक्ती देताना अडचणी निर्माण होतात. तसेच नवीन नियुक्त्या देताना महानगरपालिकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने काही प्रशासकीय अडथळे निर्माण होत आहेत.
मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगारांसाठी सेवा निवासस्थानांच्या बाबतीत आतापर्यंत ५,५९२ घरांचे वाटप करण्यात आले असून पुनर्विकासानंतर १२,२५४ सेवा निवासस्थान उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सफाई कामगारांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणात देण्यात येणारी नुकसानभरपाई १० लाखांवरून ३० लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत हाताने मैला उचलण्याच्या कामात मृत्यू झालेल्या नऊ कामगारांसह इतर ११ कामगारांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
लाड-पागे समिती अंतर्गत वारसा हक्काच्या १,९४४ प्रकरणांपैकी ४३६ जणांना नियुक्ती देण्यात आली असून काही प्रकरणे कागदपत्रांच्या अभावामुळे किंवा संबंधितांनी नियुक्ती स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे प्रलंबित असल्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
०००००
शैलजा पाटील/ वि.स.अ
मालाड मधील गायकवाडनगर येथील गृहनिर्माण प्रकल्प २०३६ पर्यंत पूर्ण होणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
खेळाचे मैदान सर्वांसाठी खुले राहणार
मुंबई, दि.१६: दादासाहेब गायकवाडनगर मालवणी, मालाड (प) मुंबई येथील म्हाडाची मालकी असलेल्या जमिनीचे दोन भाग आहेत. त्यापैकी एक भाग महाराष्ट्र पोलीस फेडरेशनकडे असून उर्वरित भागाचा विकास ‘म्हाडा’ मार्फत करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस फेडरेशनला भाडेकराराने देण्यात आलेल्या जमिनीवर उभारण्यात येणारा गृहनिर्माण प्रकल्पासाठी फेडरेशनने बांधकाम करारनामा सादर केला असून मार्च २०३६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले
सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी या विषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री देसाई म्हणाले, महाराष्ट्र पोलीस को-ऑपरेटिव हाऊसिंग फेडरेशन संस्थेला करारानुसार भाडेपट्ट्याने गृहनिर्माण पुनर्विकास योजनेसाठी देण्यात आला आहे. हा प्रकल्प नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार होत असून यातून १०७१ सदनिका उपलब्ध होणार आहेत. तसेच या अभिन्यासामधील भूखंड मनोरंजन मैदान (आरजी) म्हणून आरक्षित असून हे मैदान सर्वांसाठी खुले असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
०००
एकनाथ पोवार/ स.सं
तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक
मुंबई, दि. १६ : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्ती व विस्ताराच्या कामासाठी राज्य शासनाने ५९.७५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य योगेश टिळेकर यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा राष्ट्रीय महामार्ग ५४८- डी (रा. मा. ५५) कि.मी. ०/०० ते कि.मी. ५३/२०० हा रस्ता रांजणगाव, चाकण, तळेगाव व मुंबई एमआयडीसीतील प्रवासी व औद्योगिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्व अवजड व स्थानिक वाहतूक या लांबीमधून होत असते. एमएसआयडीसी या महामंडळामार्फत तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गही चार पदरी करण्यात येणार असून या प्रकल्पासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू असण्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.
०००
एकनाथ पोवार/ स.सं
