• Sat. Sep 21st, 2024
युवक बिरादरीच्या अध्यक्षपदी अभिषेक; डॉ. राम चढ्ढा कार्याध्यक्ष, पंकज इंगोले कार्यकारी संचालक

पुणे: युवक बिरादरीच्या केंद्रीय अध्यक्षपदी अभिनेते अभिषेक बच्चन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याशिवाय कार्याध्यक्ष म्हणून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. राम चढ्ढा आणि कार्यकारी संचालक म्हणून पत्रकार पंकज इंगोले यांची निवड करण्यात आली. युवक बिरादरीची ४९ वी आमसभा नुकतीच संपन्न झाली. त्यात या निवडीबाबत युवक बिरादरीचे संस्थापक पद्मश्री क्रांती शाह यांनी ही घोषणा केली.

२०२४ हे युवक बिरादरीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. आमसभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात अभिषेक बच्चन यांची अध्यक्षपदी फेरनिवड तर डॉ. राम चढ्ढा यांची कार्याध्यक्षपदी, आशुतोष शिर्के यांची उपकार्याध्यक्षपदी आणि स्वर क्रांती यांची कार्यकारी विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीचे कार्यकारी संचालक म्हणून पंकज इंगोले यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. १९९५ पासून सुरुवातीला भंडारा युवक बिरादरी आणि नंतर पुणे युवक बिरादरीशी संलग्न असलेले पंकज इंगोले गेले २३ वर्षे पत्रकारितेत आहेत. त्यांनी विविध वृत्त वाहिन्यांमध्ये वृत्त निवेदक म्हणून काम केलेले आहे. नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण देणाऱ्या कॅलिडस अ‍ॅकॅडमीचे ते प्रमुख आहेत. डॉ. राम चढ्ढा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते मनमोहन कृष्ण यांनी बिरादरीच्या स्थापनेत अभिनेते बलराज साहनी यांच्या बरोबरीने महत्वाची भूमिका बजावली होती. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात डॉ.चढ्ढा यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

पंकज इंगोले यांच्या समवेत कार्यकारिणीत ओडिसी नृत्यांगना ज्येष्ठ बिरादर रेखा शाह, कामगार चळवळीतील अ‍ॅड. संज्योत वढावकर, कलावंत वर्षा आचरेकर-गोसावी, नृत्य रचनाकार राजय वतनदार, अ‍ॅड.पंथी लाड, देवेंद्र सिंग, निहार देवरुखकर, सचिन वाकुडकर, प्रशांत वाघाये, सईद झाक्रिया आणि डॉ. हृदय देशमुख यांचीही निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed