तरुणीला तातडीने तीन हजार रुपयांची गरज होती. तिने एका ‘लोन अॅप’च्या माध्यमातून तीन हजार रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले. त्यानंतर एकाने तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने तरुणीला बदनामी करण्याची धमकी दिली. अश्लील संदेश आणि छायाचित्रे प्रसारित करण्याची भीती दाखवून तरुणीकडून वेळोवेळी एक लाख ११ हजार रुपये उकळले. तरुणीने घाबरून पैसे दिले. हा प्रकार थांबत नसल्याने वैतागलेल्या तरुणीने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक प्रियंका शेळके (गुन्हे) तपास करीत आहेत.
‘लोन अॅप’द्वारे कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांना धमकावून त्यांना गंडा घातल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. समाजमाध्यमांत बदनामी झाल्याने दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचीही घटना घडली होती.
पोलिस भरतीत बनावट प्रमाणपत्र
पुणे ग्रामीण पोलिस दलातील शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुजित शिवाजी साळुंखे (वय २५, रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय २६, रा. वडोली, ता. माढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. साळुंखे आणि माने यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलातील भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र दोघांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. प्रमाणपत्र बनावट असल्याचे तपासणीत उघडकीस आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.