• Sat. Sep 21st, 2024

नाशिकला लाचखोरीचं ग्रहण कायम; ४० लाखांच्या लाचेची मागणी उपविभागीय अधिकाऱ्याला भोवली, जिल्ह्यात खळबळ

नाशिकला लाचखोरीचं ग्रहण कायम; ४० लाखांच्या लाचेची मागणी उपविभागीय अधिकाऱ्याला भोवली, जिल्ह्यात खळबळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : एका कंपनीला बजावलेल्या नोटिशीनुसार कारवाई न करण्यासाठी पन्नास लाखांची मागणी करून तडजोडीअंती चाळीस लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने दिंडोरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. डॉ. नीलेश अपार (वय ३७) असे संशयित अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी बुधवारी सायंकाळी ही कारवाई केली असून, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दिंडोरी येथील एका खासगी कंपनीच्या बांधकामावेळी तक्रारदाराने अकृषक परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे डॉ. अपार यांनी संबंधित कंपनीला नोटीस बजावली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितले होते. या नोटिशीनुसार कारवाई न करण्यासाठी डॉ. अपार यांनी तक्रारदाराकडे पन्नास लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती बुधवारी (दि. २८) सायंकाळी तक्रारदाराकडून चाळीस लाख रुपये घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली. यासंदर्भातील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ. अपार यांच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. लाचेची केवळ मागणी असल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेतले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महिनाभरापूर्वी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना तीस लाख रुपयांची लाख स्वीकारताना पकडण्यात आले होते. तेव्हापासून खरे कारागृहात आहे. त्यानंतर आता महसूलच्या उपविभागीय अधिकाऱ्याने चाळीस लाख रुपये लाच घेण्याची तयारी दर्शवल्याने महसूल विभागासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरड कोसळल्याने आंबेनळी घाटबाबत ताजी अपडेट समोर, ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना
प्रथमच एवढी मोठी कारवाई

यापूर्वी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागात लाचेबाबतच्या अनेक कारवाया केल्या आहेत. किंबहुना महसूल विभाग हा लाचखोरीत राज्यात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना यापूर्वी लाच स्वीकारताना किंवा लाचेची मागणी करताना पकडण्यात आले आहे. परंतु, जिल्हा महसूल विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपविभागीय अधिकारी पदावरील व्यक्तीला एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करताना किंवा ती स्वीकारण्याच्या तयारीत पकडण्यात आले. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कारवाईची माहिती राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. केवळ नाशिक विभागातच नाही तर डॉ. अपार यापूर्वी उपविभागीय अधिकारी राहिलेल्या अकोला जिल्ह्यासह अनेक ठिकाणी या कारवाईचे मेसेज सोशल मीडियावरून व्हायरल झाले. काही महिन्यांपूर्वी डॉ. अपार याने दिंडोरीत पदभार स्वीकारला. अकोला येथेदेखील डॉ. अपार यांच्या कामाच्या पद्धतीबाबत लोकांत नाराजी होती, अशी माहिती पुढे आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed