• Sat. Sep 21st, 2024
प्रेमात नकार, शस्त्रांसह वार, तरुणांमध्ये का वाढली हिंसा? मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं कारण

म. टा. प्रतिनिधी, पुणे : सध्याच्या तरुण पिढीला सर्व गोष्टी सहज उपलब्ध होत असल्याने कोणत्याही बाबतीत नकार सहन करण्याची सवय राहिलेली नाही. नातेसंबंधांमध्येही आपल्या मनाप्रमाणेच व्हावे, अशी अनेकांची अपेक्षा असते. मात्र, तसे न झाल्यास रागातून टोकाचे कृत्य केले जाते. नातेसंबंधात नकार मिळाल्यामुळे नैराश्य येणे, एकटेपणाची भावना निर्माण होणे, नैराश्यातून चुकीचे पाऊल उचलणे अशा घटनांत वाढ झाल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

मुलींना गृहित धरू नका; तसेच टोकाचे पाऊल उचलून गुन्हेगारीकडचा प्रवास रोखण्यासाठी तरुणांनी नकार पचवायला शिकले पाहिजे, हीच बाब शहरातील दोन घटनांनी अधोरेखित केली आहे.

पुण्यात भर दिवसा भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने वार, २ तरुणांमुळे सुदैवाने वाचले प्राण

सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी पावणेदहा वाजता एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करून तिच्यावर कोयत्याने वार केला. लग्नास नकार दिल्याने घडलेले दर्शना पवार खून प्रकरण ताजे आहे. शहरात नातेसंबंधांतून गुन्हेगारी कृत्यांच्या घटना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नातेसंबंध कशा प्रकारे जपावेत, याची समज येणे आवश्यक असल्याकडे मानसोपचारतज्ज्ञांनी लक्ष वेधले.

मुंबई गोवा महामार्गावर बसेसची जोरदार धडक, एसटीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा, तिघांची प्रकृती गंभीर

मला हवे ते मी मिळवणारच, असे वाटण्याचे प्रमाण समाजातील सर्वच स्तरांमध्ये वाढले आहे. त्यामुळे मनासारखे न मिळाल्यास कोणत्याही मार्गाने ते मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. परिणामी, यातूनच गुन्हेगारीसारखे कृत्य केले जाते. एखाद्या व्यक्तीला इतका राग का येतो, याचाही मानसोपचाराच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. मुलांमध्ये काही अनपेक्षित बदल पालकांना लक्षात आले, तर त्यांनी मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. घरात काय वातावरण आहे, याचा सकारात्मक व नकारात्मक परिणाम मुलांवर होत असतो. त्यामुळे पालकांनीही घरातील वातावरण चांगले ठेवणे आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले.

नकार स्वीकारण्याची सवय नसल्याने अनेकांना नातेसंबंधांमध्ये नकार स्वीकारता येत नाही. अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण आवश्यक आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंध कसे असावेत, संयम कसा ठेवावा, निराशेला आवर कसा घालावा, याची माहिती लैंगिक शिक्षणातून मिळू शकते.

– डॉ. उल्हास लुकतुके,

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

बहुतांश जणांना लहानपणापासून कोणत्याही गोष्टीसाठी नकार मिळालेला नसतो. त्यामुळे अशांना सर्व गोष्टी सहजासहजी मिळतात. त्यामुळे नकार सहन करणे कठीण जाते. परिणामी, यातून येणारा राग अनावर झाला, की गुन्हेगारीचे कृत्य केले जाते. प्रेमसंबंधांत अनेकदा खूप अपेक्षा ठेवल्या जातात. प्रत्यक्षात त्या पूर्ण झाल्या नाहीत, तर गुन्हेगारी कृत्य केले जाते. त्यामुळे नातेसंबंध किंवा प्रेमसंबंध म्हणजे काय, यावर तरुणांना मार्गदर्शन केले पाहिजे.

– अस्मिता दळवी, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, वायसीएम रुग्णालय

नातेसंबंध कसे जपावेत, याची समज अनेकांना नसते. नातेसंबंधांमध्ये होकार किंवा नकार मिळाल्यास सामंजस्याने निर्णय घेणे आवश्यक आहे. नकार मिळाल्याने राग येतो; तसेच अनेकांना दुःख सहन होत नाही. या नैराश्यातून मानिसक आजार बळावण्याची शक्यता असते. नैराश्यात गेल्यामुळे झोपेच्या गोळ्या घेणे, आत्महत्येचा विचार करणे किंवा संबंधित व्यक्तीला मारहाण करणे अशा घटनांत वाढ होत आहे.

– डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed