कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक सुधाकर शिंदे यांची बदली दुसऱ्या शाळेत करण्यात आली आहे. मात्र ही बदली येथील शिक्षकाचा लळा लागलेल्या विद्यार्थ्यांना मान्य नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकाची बदली रद्द व्हावी यासाठी पावसातच अनोखे आंदोलन केले. यासाठी त्यांनी रस्त्यावर आंदोलन केले. यामुळे गावातील वाहतूकही तासभर ठप्प झाली होती. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते. पावसाची तमा न बाळगता विद्यार्थ्यांनी शिक्षकाची बदली रद्द व्हावी यासाठी ठिय्या मांडला होता. रद्द करा, शिंदे सरांची बदली रद्द करा अशा घोषणाही त्यांनी यावेळी दिल्या.
शिक्षक सुधाकर शिंदे हे १६ वर्षांपासून या शाळेत ज्ञानदानाचे काम करत आहेत. त्यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शनही केले आहे. चांगले शिक्षण कसे देता येईल, हाच ध्यास घेऊन या विद्यार्थ्यांना आपण एका कुटुंबातीलच आहोत, हे दाखवून देत चांगलाच लळा लावला आहे. येथील विद्यार्थ्यांना शिंदे गुरुजी यांचा लळा इतका लागला, की नुकतेच त्यांची बदली करण्यात आली. बदली थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला आव्हानच दिले आहे. जोपर्यंत लाडक्या शिक्षकाची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या जिल्ह्यात पाऊस सुरू असून या पावसातही विद्यार्थ्यी रास्ता रोको करून बदली रद्द करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. शिंदे यांची बदली झाली तर शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होऊन ही शाळा काही दिवसातच बंद पडण्याची शक्यता आहे. ती बंद होऊ नये ही ग्रामस्थांची अपेक्षा असून या शिक्षकाची बदली रद्द करावी, अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. या लाडक्या शिक्षकाची बदली रद्द करण्याच्या आंदोलनात विद्यार्थ्यांसह पालकही सहभागी झाले होते.