• Wed. Nov 13th, 2024

    एका वानराने मद्यपी अन् टवाळखोरांना केले सरळ; वानर दिसता क्षणीच ठोकतात धूम, नेमकी घटना काय?

    एका वानराने मद्यपी अन् टवाळखोरांना केले सरळ; वानर दिसता क्षणीच ठोकतात धूम, नेमकी घटना काय?

    म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर : साईनाथनगर सायकल ट्रॅकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मद्यपी गर्दुल्यांचा वावर वाढल्याने ट्रॅककडे सायकलप्रेमींनी पाठ फिरवली आहे. या ट्रॅक परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एका वानराची एन्ट्री झाल्याने ट्रॅकमध्ये बसणाऱ्या मद्यपींचे धाबे दणाणले आहे. यामुळे सायकल ट्रॅकवर आता वानराने धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसरीकडे वानराच्या एन्ट्रीने टवाळखोरांनी ट्रॅकवरून काढता पाय घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या साईनाथ नगरच्या सायकल ट्रॅकमध्ये अनेक सायकल प्रेमी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक येतात. विशेष म्हणजे, मद्यपी आणि टवाळखोर या ट्रॅकवर ठाण मांडलेली असताना चार ते पाच दिवसांपूर्वी या सायकल ट्रॅकवर जंगलातून भरकटलेल्या एका वानराची एन्ट्री झाली आहे. विशेष म्हणजे, या वानराला बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. वानर जखमी अवस्थेत असल्याने कोणीही नागरिक तसेच युवक-युवती हातात बॅग तसेच कोणत्याही सामान घेऊन आल्यास सदर वानर त्या नागरिकांच्या हातातील साहित्य पळवून नेत आहे.

    ट्रॅकमध्ये येणाऱ्या नागरिकांनी वानराला पाहून हातातील साहित्य लपविल्यास सदर वानर हे थेट नागरिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे. वानराची छेड काढणाऱ्या चार ते पाच नागरिकांना या वानराने कानशिलात लगावल्याचा प्रकार प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आला आहे. तर काही नागरिक स्वतःहून या वानराला खाण्यापिण्यासाठी फळभाज्या देत आहेत.
    नाल्यातून फ्रीज, कपाट, पलंग आले वाहत; अंधेरी सब वे तुंबण्यावरुन BMC चं कारण
    टवाळखोर पळाल्याने समाधान

    मंगळवारी सकाळी वानराने साईनाथनगर सिग्नल परिसरातील दुभाजकावर ठाण मांडले. त्यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांना वानराचा फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. यात वानराने दोन मोबाइलही नागरिकांच्या हातातून नेले. दोन ते तीन दिवसापासून दहशत माजवणाऱ्या या वानराचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. एकीकडे सायकल ट्रॅकवर टवाळखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असताना माकडाच्या एन्ट्रीमुळे टवाळखोरांनी सायकल ट्रॅकचा ताबा सोडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed