१८ हजार कोटीच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीमध्ये केले होते. भूमिपूजन झाल्यावर प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्याची प्रतीक्षा तमाम मुंबईकरांना होती.
सीएसएमटी पुनर्विकास करताना परिसरातील रेल्वे इमारती अन्यत्र स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून पुनर्विकासाची देखरेख करण्यात येत आहे. कंत्राटदारांकडून सीएसएमटीची पाहणी पूर्ण झाली असून पावसळ्यानंतर इमारती, कार्यालये स्थलांतरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे, असे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी सांगितले.
मुंबई-उपनगरासह देशातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रवाशांची एक्स्प्रेसची प्रवासी गर्दी सीएसएमटीतून हाताळली जाते. यामुळे प्रवासी वर्दळ सुलभता आणि उपलब्ध जागेचा व्यावसायिक वापर यांवर पुनर्विकासात लक्ष्य केंद्रीत करण्यात येणार आहे.
सीएसएमटी मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेले आयआरसीटीसीचे बेस किचन पाडण्यात येणार आहे. मुख्य टपाल कार्यालयाच्या (जीपीओ) प्रवेशद्वाराजवळ सर्व प्रकारच्या वाहनांना मुभा दिली जाणार नाही. सध्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय परिसर आणि फलाट ९ ते १४ समोरील प्रवेशद्वारासमोरील परिसरात पादचारी क्षेत्र म्हणून तयार करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सध्या परिसरात रेल्वे अधिकाऱ्यांची वाहने उभी राहतात.
सीएसएमटी ते भायखळा दरम्यान एकूण सुमारे २.५ लाख चौरस मीटर जागा पुनर्विकासाअंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. यापैकी सीएसएमटीमध्ये १.४ लाख चौरस मीटर जागा, भायखळा येथे ८० हजार चौरस मीटर आणि वाडीबंदर परिसरातील ३० हजार चौरस मीटर जागेचा समावेश आहे.
सीएसएमटी पुनर्विकासात लोकल फलाटाच्या छतावर प्लाझाची उभारणी करण्यात येणार आहे. प्लाझाची जोडणी सर्व फलाटांना देण्यात येणार आहे. यामुळे सध्याची लोकल आणि मेल-एक्स्प्रेस प्रवाशांची गर्दी विभागण्यास मोठी मदत होणार आहे. प्रवाशांना किरकोळ खरेदीसाठी पी डिमेलो मार्गावर बहुपयोगी मॉल उभारण्यात येणार आहे.