पोलादपूरपासून २१ ते २२ किमी अंतरावर ही दरड कोसळली आहे. मंगळवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ही दरड हटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती. पाऊस सुरू झाल्यावर महाड आणि पोलादपूर भागात विविध ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. तसेच पोलादपूर तालुक्यात पैठण ते पांगळोलीमार्गे ओंबळी रस्त्यावरही दरड कोसळल्याची घटना घडली होती. प्रशासनाकडून ही दरड हटविण्यात यश मिळविल्याची माहिती तहसीलदार कपिल घोरपडे यांनी दिली. महाड प्रशासनही या सगळ्यावर लक्ष ठेऊन आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आंबेनळी घाटातील दरड काढण्यात आल्यानंतर या मार्गावरची वाहतूक सुरू केली जाईल अशी माहिती पोलादपूर तालुका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान यात नवी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ एमआयडीसीमध्ये कामासाठी निघालेल्या तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दिप्ती दत्तात्रेय आंग्रे असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती नेहमी प्रमाणे मोटारसायकलवरुन महाड काकरतळे येथून महाड एमआयडीसीमधील ए एल जी केमिकल कंपनीमध्ये कामावर जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगावजवळ ही घटना घडली. यात तिच्या डाव्या पायावर दगड लागून गंभीर दुखापत झाली आहे.
महाड एमआयडीसीमधील एम एम ए हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले. या सगळ्या घटनेला महाड प्रशासनाकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. महामार्गावर दरड व दगड कोसळण्याआधी प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे. कोकणात पाऊस झाल्यावर महामार्गावर दगड कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. दरम्यान कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी अक्षशः चिखलाच साम्राज्य तयार झाले आहे. चिपळूण शहरातून जाणाऱ्या या महामार्गावरही गेले कित्येक महिने काम सुरू असल्याने चिखलाचे साम्राज्य आहे.