• Sat. Sep 21st, 2024

पावभाजीच्या गाडीवर भांडी धुतली, झोपडपट्टीतल्या मुलांसाठी बनला शिक्षक, नागपूरच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी

पावभाजीच्या गाडीवर भांडी धुतली, झोपडपट्टीतल्या मुलांसाठी बनला शिक्षक, नागपूरच्या तरुणाची प्रेरणादायी कहाणी

नागपूर : अवैध दारूविक्री, गुन्हेगारी अशा कारणांमुळे नागपूरची रहाटेनगर टोळी झोपडपट्टी नेहमीच चर्चेत असते. पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाहासाठी काबाड कष्ट, भीक मागणे, म्हैस चारणे आदी कामात गुंतलेल्या या समाजापर्यंत शिक्षणाची गंगा क्वचितच पोहोचली. मात्र, एका महत्त्वाकांक्षी तरुणाने परिवर्तनाचा ध्यास बाळगला आपल्यावर आलेली गरिबी पुढच्या पिढीपर्यंत जाऊ नये यासाठी तो झटत आहे. खुशाल ढाक यांनी मोफत शिक्षणाद्वारे गरिब वस्तीत मोठा बदल घडवून आणला आहे.गरिबांच्या शिक्षणासाठी पुढाकार

रहाटेनगर टोळी झोपडपट्टीत मोफत शिक्षणातून खुशाल ढाक नावाच्या तरुणाला सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. संस्काराची बीजे पेरणाऱ्या वस्तीशाळेपासून सुरू झालेला खुशाल ढाकचा प्रवास आज अभ्यसिकेपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी आजवर शेकडो विद्यार्थ्यांना शिकवले आहे. समाजातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, या मानसिकतेतून खुशाल यांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी स्वत:ला झोकून दिले आणि परिवर्तनाची चळवळ निर्माण झाली.
नागपुरात तब्ब्ल २ लाख झाडे तोडण्याची भीती; रहिवाशांचा विरोध, झाडाला मिठी मारत ‘चिपको’ आंदोलन
समाजातील अंधकार दूर करायचाय

मी राहत असलेल्या भागात मांग, गारोडी समाजातील लोक राहतात. येथील रहिवाशांना गरिबीचे जीवन जगावे लागत आहे. अवैध दारू विकणे, भीक मागणे, चोरी करणे, कचरा उचलणे, म्हशी भादरणे हे लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. या व्यवसायात यांच्या अनेक पिढ्या गेल्या. मला परिस्थितीची जाणीव होती. कारण मी ती माझ्या डोळ्यांनी पाहिली होती. माझे बालपण कठीण होते. प्रतिकूल परिस्थितीत मी अभ्यास केला. आता समाजात पसरलेला हा अंधार दूर करण्यासाठी मला काहीतरी करायचे आहे. यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे खुशाल सांगतात.
हवालदाराने रागात विजेच्या डीपीत हात घातला, एकदा वाचला, उठून पुन्हा हात लावला अन् खेळ संपला
… आणि शिक्षक जन्माला आला

नागपुरातील धंतोली भागातील पावभाजीच्या ठेल्यावर मी भांडी घासण्याचे काम केले. दरम्यान, जवळच्या झोपडपट्टीतील मुले प्लेटमधील उरलेले अन्न घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे नेहमी यायची. मी त्यांना ते देत होतो. पण एके दिवशी असे ठरवले की आपण त्यांना सहजासहजी न देता A for, B for शिकवू आणि मग त्यांनी बरोबर उत्तर दिल्यास त्यांना खायला देऊ. बरेच दिवस हे घडत होते आणि माझ्यातला शिक्षक इथेच जन्माला आला, असे खुशाल म्हणाले.

झाडाखाली सुरू झाली शाळा

रहाटेनगर वस्तीमधील मुलांना नियमित भेटी देऊन शिकवण्याचे काम सुरू होते. हीच प्रेरणा घेऊन मी रहाटेनगर टोळी वस्ती येथे एका झाडाखाली मुलांसाठी शाळा सुरू केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. विरोधही करण्यात आला. पण खेळातून मुलांचे शिक्षण सुरूच होते. समाजाच्या संमिश्र तीव्र प्रतिक्रियेतून प्रचंड त्रास झाला. मात्र, तरीही शाळा नियमित सुरू राहिल्याचे खुशाल ढाका यांनी सांगितले.

ग्रामीण पोलिसांच्या वायरलेस विभागात अधिकारी दारू पिऊन ड्युटीवर; पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी

बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणारी पहिली पिढी

मी गेल्या १६ वर्षांपासून या चळवळीत आहे. रहाटेनगर वस्ती झोपडपट्टीतील वारंवार होणारी भांडणं, मारामारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी पार्श्वभूमी इत्यादी समस्या जवळून पाहिल्या आहेत. या पिढीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी ही चळवळ प्रत्यक्षात सुरू केली. एका झाडाखाली सुरू झालेली शाळा आज निवासी शाळा, वाचनालय, कॉन्व्हेंट, शिवणकाम केंद्र, संगणक प्रशिक्षण, फुटबॉल प्रशिक्षण, क्रीडापटू प्रशिक्षण अशी वाढली आहे. झोपडपट्टीतील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मार्गावर आले आहेत. या चळवळीतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पहिली पिढी तयार करू शकलो याचा अभिमान वाटतो, असे खुशाल सांगतात.

शिक्षणासह रोजगार निर्मिती

नागपूरच्या छत्रपती चौकात भीक मागणाऱ्या मुली आता येथील टेलरिंग सेंटरमधून प्रशिक्षण घेऊन ब्लाउज, ड्रेस आदी शिवून स्वावलंबी झाल्या आहेत. आज या टेलरिंगच्या कामातून २५० हून अधिक मुलींना रोजगार मिळत आहे. विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षणासोबतच आम्ही मोफत फुटबॉल प्रशिक्षण, ॲथलेटिक प्रशिक्षणही सुरू केले. त्याचाच परिणाम म्हणून आज खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत नावलौकिक मिळवत आहेत. बारावीनंतर येथील विद्यार्थी आज ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. ही परिवर्तनाची नांदी असून आम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे अनेक लोकांकडून पाठिंबा व मार्गदर्शन मिळाले आहे. आपले मत व्यक्त करताना खुशाल ढाक म्हणाले की, हा त्याचाच परिणाम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed