‘पक्ष संघटनेच्या कामात सर्वांनी लक्ष घालावे अशी प्रत्येकाचीच भावना आहे. तेच मत अजित पवार यांनी पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले आहे, त्यात यापेक्षा वेगळे काही नाही,’ असेही पवार यांनी नमूद केले.
‘पंतप्रधानपदावर चर्चा नाही’
‘पाटण्यातील बैठकीत आगामी पंतप्रधान या विषयी कोणतीही चर्चा झाली नाही. महागाई, बेरोजगारी, सांप्रदायिक शक्ती वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल बैठकीत चर्चा झाली. कोणत्याही राज्यात जाती-धर्मात मतभेद वाढल्यास ते समाजाच्या दृष्टीने चांगले नाही. सत्ताधारी भाजप तशी पावले टाकत आहे. या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, हा बैठकीत चर्चेचा विषय होता,’ याकडे शरद पवार लक्ष वेधले.
देवेंद्र फडणवीसांना टोला
‘एकनाथ शिंदे यांनी केली तर बेईमानी व शरद पवारांनी केली तर मुत्सदेगीरी,’ या टीकेवर पवार यांनी ‘मी बेईमानी कधी केली हे त्यांनी सांगावे,’ असा सवाल केला. ‘सन १९७७ साली आम्ही सरकार बनवले. त्यात भाजप माझ्यासोबत होता. त्यामुळे त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहिती नसेल. मी जे सरकार बनवले ते सगळ्यांना घेऊन केले. त्यात त्या वेळचा जनसंघ, त्याचे उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री होते, आणखी काही सदस्य होते. मला वाटते देवेंद्र फडणवीस प्राथमिक शाळेत कदाचित असतील त्यामुळे त्यांना त्या काळातील माहिती नसेल. त्यामुळे ते अज्ञानापोटी अशी विधाने करीत आहेत,’ असा टोला पवारांनी फडणवीस यांना लगावला.
के. चंद्रशेखर राव यांना राज्यातील नागरिकांची सेवा करायची असेल, तर त्यांचे स्वागत आहे. त्यांना साधन, संपत्तीची चिंता नाही. आगामी काळात ते आव्हान निर्माण करतील का हे निवडणुकीतच दिसेल, असंही शरद पवार म्हणाले.