राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं संभाजी राजे आज पुण्यातल्या ऑल इंडिया कॉलेज या ठिकाणी आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत. समतेचा लढा शाहू महाराजांनी उभा केला. तसेच बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका कोणी घेतली असेल तर शाहू महाराजांनी घेतली. तसेच वंचितांना न्याय देण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आज राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आजच्या निमित्ताने एवढे सांगू इच्छितो की सर्वच पक्षांना शाहू महाराज यांना सोडून राजकारण करता येणार नाही. राजर्षी शाहू महाराज आजही राज्याचे रोल मॉडेल,” असल्याचं यावेळी संभाजीराजे म्हणाले.
अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, की “ज्याने शिवाजी महाराजांना त्रास दिला, संभाजीराजेंची हत्या केली, त्याचं कुणी कसं कौतुक करू शकते? हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत.” वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर भेट दिल्याबाबतही त्यांनी खेद व्यक्त केला. संभाजीराजे छत्रपती काल नाशिकमध्ये बोलत होते. दरम्यान, बुलढाण्यातील कथित घोषणाबाजीमुळं राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं होतं.