स्पर्धांमध्ये नाव दाखल करायची अंतिम मुदत असते त्याचप्रमाणे बक्षीस समारंभ ठरावीक कालावधीत घेण्याचीही तरतूद व्हायला हवी, असेही ते म्हणाले. अनेकदा या स्पर्धांसाठी जिल्हा समन्वयक म्हणून काम करणाऱ्यांना सभागृहाची बिलेही वेळेत चुकती करता येत नाहीत. त्यासाठी खिशातले पैसे खर्च करायला लागतात, या मुद्द्याकडेही पटवर्धन यांनी लक्ष वेधले; तसेच या माध्यमातून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव गुणांची तरतूदही होऊ शकते; पण प्रमाणपत्र नसल्याने विद्यार्थ्यांचा तोटा होतो, असेही ते म्हणाले.
६०व्या स्पर्धेच्या व्यावसायिक नाट्यस्पर्धेचे निकाल रखडल्याची तक्रार व्यावसायिक नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांनी केली. करोनामुळे अंतिम फेरीतील सर्व नाटके सादर झालेली नाहीत. मात्र, सहा नाटके सादर झाल्याने त्यांचा विचार पारितोषिकासाठी का होत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ज्या संस्था नाटक अंतिम फेरीसाठी सादर करू शकणार नाहीत त्यांच्याकडून त्यासंदर्भातील पत्र लिहून उर्वरित सादरीकरणाच्या आधारे निकाल का लावला जात नाही, असाही मुद्दा त्यांनी मांडला.
माहिती देण्यास नकार
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी तीन जुलैपर्यंत रजेवर असल्याने याविषयी माहिती देणार नसल्याचे सांगितले. सध्याचे प्रभारी आणि सहसंचालक श्रीराम पांडे यांनी माहिती देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. मात्र, दहा किंवा अकरा तारखेच्या सुमारास पारितोषिक वितरण कार्यक्रम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रकमांचीही तरतूद झाल्याचे कळते. त्यामुळे निधीमुळे पारितोषिक लांबलेले नाही अशीही माहिती नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगण्यात येत आहे. नाट्य कलाकारांपर्यंत याची कारणे पारदर्शीपणे पोहोचली पाहिजेत, अशी मागणी या संदर्भात करण्यात येत असून, हा समारंभ सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने लांबणीवर पडत आहे का, असाही प्रश्न विचारला जात आहे.