• Sat. Sep 21st, 2024
जळगावात मध्यरात्री महापुरुषांची विटंबना, आरोपीला अटक; गुन्ह्याचं धक्कादायक कारण समोर

जळगाव : दोन दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केल्याने त्यांच्या बापाला राग आला. त्याने मुलांना अटक केल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना “दोन दिवसात तुम्हाला कामाला लावतो,” अशी धमकी दिली होती. त्यानंतर या बापाने महापुरुषांची विटंबना करून पोलिसांना कामाला लावल्याची माहिती समोर आली आहे. महापुरुषांची विटंबना करणाऱ्या या संशयिताला अटक केली आहे. गोकुळ हंसराज राठोड (वय ५२ रा. आदर्श नगर) असं अटकेतील संशयिताचे नाव आहे.

जळगावातील समता नगरात महापुरुषांची विटंबना केल्याची घटना काल शनिवारी भल्यापहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास समोर आली. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांसह समाज बांधवांनी मोठा रोष व्यक्त करत महापुरुषांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या मागणीसाठी जळगावात मोर्चा सुद्धा काढला.

या प्रकारामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. महापुरुषांची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पोलिसांनी विटंबना करणारा गोकुळ हंसराज राठोड याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यात त्यानेच मध्यरात्री समता नगरात जाऊन महापुरुषांची विटंबना केल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, गोकुळ हंसराज राठोड हा सराईत गुन्हेगार असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. २००१ पासून त्याच्यावर घरफोडी, चोरीसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गोकुळ राठोड प्रमाणेच त्याची मुलं सुद्धा गुन्हेगारीच्या विळख्यात सापडली आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या वकील महिलेची सोनसाखळी दोन चोरट्यांनी लांबविली होती.

या गुन्ह्यात रेकॉर्डवर असलेल्या गोकुळ हंसराज राठोड याच्या उमेश आणि राकेश राठोड या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर रागाच्या भरात गोकुळ हंसराज राठोड याने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले आणि या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना “तुम्ही माझ्या मुलांना अटक करून चांगलं केलं नाही. दोन दिवसात मी तुम्हाला चांगलं कामाला लावतो,” अशी धमकी दिली होती. यानंतर मुलांना अटक केल्याच्या रागातूनच गोकुळ राठोड याने मध्यरात्री समता नगर येथे महापुरुषांची विटंबना केली. यावेळी त्या ठिकाणी दोन ते तीन जणांनी त्याला पाहिलं आणि त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोकुळ पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

सकाळी महापुरुषांची विटंबना केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तसेच हा प्रकार गोकुळ राठोड याने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला अटकेनंतर समाजबांधवांची समजूत घालत असताना पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनीच गोकुळ राठोड याने दोन दिवसापूर्वी पोलिसांना कामाला लावण्याची धमकी दिली होती आणि त्यातूनच हा प्रकार केल्याचं बोलताना सांगितलं.

दरम्यान, गोकुळ राठोड विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अटक करण्यात आलेल्या गोकुळला पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले. यात न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र जी.काबरा यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed