• Mon. Nov 25th, 2024
    Maharashtra Weather Alert: पुण्यात आनंदसरी, राज्यात पुढील दोन दिवसात… वाचा वेदर रिपोर्ट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: बंगालच्या उपसागरासोबत अरबी समुद्रातील शाखाही सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची गेले १३ दिवस रखडलेली वाटचाल शनिवारी पुन्हा सुरू झाली. मान्सूनने शनिवारी उत्तर कोकणातील अलिबागपासून मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील उदगीर आणि विदर्भातील नागपूरपर्यंत मजल मारली. हवामान अनुकूल असल्याने पुढील दोन दिवसांत मान्सून पुणे-मुंबईसह महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) म्हटले आहे.सध्या वायव्य बंगालच्या उपसागरावरील वातावरणात चक्रीय स्थिती असून, रविवारपर्यंत त्यापासून हंगामातील पहिले कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टाही सक्रिय झाला असून, गुजरातजवळ अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीच्या प्रभावामुळे मोसमी वाऱ्यांच्या प्रवाहाला जोर आला असून, ही स्थिती मान्सूनच्या प्रगतीसाठी आणि पावसासाठी पोषक असल्याचे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे.

    पुण्यात पावसाची हजेरी

    पुण्यात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधून मधून पावसाच्या सरी सुरू होत्या. शहरात दोन दिवसांनंतर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही शनिवारी पावसाच्या सरी बरसल्या. पुण्यात रात्री साडेआठपर्यंत १३.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावरही पाऊस झाला. पावसाचा जोर वाढल्यास पुण्यातील जून महिन्याची सरासरी आठवडाभरात ओलांडली जाण्याची शक्यता आहे.

    मान्सून आगमनाची आज घोषणा?

    कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रात शनिवारी सकाळपासून अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून, काही ठिकाणी पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली. नाशिक, नगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील घाटालगतच्या भागांमध्येही दिवसभर पावसाची रिपरिप अनुभवायला मिळाली. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांसह सर्वदूर पावसाची लक्षणे मान्सूनची असली, तरी मान्सून आगमनाच्या निकषांनुसार २४ तासांतील पावसाच्या नोंदी गृहीत धरून संबंधित भागांमध्ये मान्सूनचे आगमन दुसऱ्या दिवशी जाहीर केले जाते. त्यामुळे मुंबई-पुण्यातील मान्सूनचे आगमन आज, रविवारी जाहीर होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

    मुंबईत पावसाची हजेरी

    कमी दाबाचे क्षेत्र

    बंगालच्या उपसागरात रविवारी तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास पुढील काही दिवसांत मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता हवामानशास्त्रीय मॉडेल वर्तवत आहेत. या क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात पुढील चार दिवस, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २६ ते २८ जून दरम्यान सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरींचीही शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed