• Sat. Sep 21st, 2024

नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये अवघा १५ टक्के पाऊस; पावसाअभावी टंचाईचे दाटले ढग

नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये अवघा १५ टक्के पाऊस; पावसाअभावी टंचाईचे दाटले ढग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांत चिंता व्यक्त केली जात असून, जोरदार पावसाची प्रतीक्षा जूनअखेरीसही कायम आहे.मान्सूनच्या वाटचालीस यंदा एल निनो व बिपर्जय वादळाचा फटका बसला. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाला विलंब झाला असून, जून महिना संपत येऊनही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. पावसाअभावी जिल्ह्यावर टंचाईचे ढग दाटले आहेत. जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३३.७ मिलिमीटर आहे. मात्र, या महिन्यात आतापर्यंत अवघा २१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सरासरीशी तुलना केल्यास त्याचे प्रमाण अवघे १५ टक्के आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये जिल्ह्यात ९२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरीत जूनमधील सरासरीच्या अवघा पाच टक्के पाऊस झाला असून, त्र्यंबकेश्वरमध्ये सरासरीच्या १८ टक्के, तर नाशिक तालुक्यात नीचांकी ४.७ टक्के पाऊस झाला आहे. त्या तुलनेत कळवणमध्ये ४५ टक्के, त्या खालोखाल मालेगाव येथे ३८, तर देवळ्यात ३४ टक्के पाऊस झाला आहे. दरम्यान, मान्सूनची आगेकूच सुरू असून, त्याचे विदर्भ, मराठवाड्यात आगमन झाले आहे. मात्र, तो अद्याप नाशिकमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

धरणांमध्ये २२ टक्के जलसाठा

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणसमूहात २१ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्या वर्षी या काळात तो २४ टक्के होता. जिल्ह्यातील मोठ्या सात व मध्यम १७ अशा एकूण २४ धरण प्रकल्पांमध्ये २२ टक्के पाणीसाठा असून, येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास हा साठा आणखी खालावण्याची चिन्हे आहेत.

जूनमध्ये झालेला पाऊस ( मिलिमीटरमध्ये)

मालेगाव ३०.५, बालगाण २५.६, कळवण ४८.२, नांदगाव २१, सुरगाणा २४.१, नाशिक ५.६, दिंडोरी १४.७, इगतपुरी १९.१, पेठ १८.७, निफाड १६.९, सिन्नर १५.९, येवला ९.६, चांदवड ७.४, त्र्यंबकेश्वर ४४.२, देवळा २६.८.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed