मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक कोणताही प्रोटोकॉल न घेता सातारा जिल्ह्यातील त्यांचे मूळ जन्मगाव दरे येथे हेलिकॉप्टर मधून काल दुपारी दाखल झाले होते .मुख्यमंत्री अचानक राज्याचा कारभार सोडून मुळगाव दरे येथे सुट्टीवर आले आणि सुट्टीवर आल्यानंतर मुख्यमंत्रींनी थेट जनता दरबार भरवला. या जनता दरबारामध्ये सातारा जिल्ह्यातील शेकडो नागरिक आले होते. त्यांनी आपले प्रश्न आणि अडचणी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडल्या . यावेळी मुख्यमंत्रीय शिंदे यांनी अगदी गावातल्या सरपंचासारखं प्रत्येकाचे प्रश्न ऐकून घेतले आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नांचा निपटारा केला.
यावेळी कोयना विभागातील नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपल्या अडी-अडचणी मांडण्यासाठी एकच गर्दी केली. मुख्यमंत्री शिंदे गावी आल्यानंतर जनता दरबार भरवत असतात. त्यामुळे अचानक गावी आलेले मुख्यमंत्री यावेळीही जनता दरबार भरवतील, या आशेने कोयना महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रांगेत उभे राहून आपापले प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर प्रत्येक जण आपली समस्या घेऊन उभे राहिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नीसह शेती कामात व्यस्त:
मुख्यमंत्री शिंदे जेव्हा विश्रांतीला त्यांच्या गावात येतात तेव्हा नेहमीच ते शेती करण्याचा आनंद घेत असतात. या वेळी सुद्धा शिंदे दांम्पत्यांनी शेतात नवीन झाडे लावली तसेच केळीची बाग देखील तयार केली आहे. त्यामध्ये केळीची रोप लावत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी दिसत आहेत. या वेळी त्यांच्या सोबत कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे सुद्धा दिसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दोन दिवस मुक्कामी आले असून कोरेगाव तालुक्याचे आमदार आणि शिवसेना नेते महेश शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची दरे गावी जाऊन भेट घेतली. यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोघांनी शेतीची पाहणी करत जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली.