कोण आहेत विवेक कोल्हे?
विवेक बिपिन कोल्हे हे माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता बिपिन कोल्हे यांचे चिरंजीव आहेत. तसेच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक असून विविध ८ ते १० सहकारी संस्थांवर देखील ते सदस्य आहे.
३३ वर्षीय विवेक कोल्हे यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले असून अभियांत्रिकीचे शिक्षण नाशिक येथे पूर्ण करून त्यांनी बीई सिव्हील पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१७ साली संजीवनी सहकारी साखर कारखान्यात तज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड झाली.
विवेक कोल्हे यांनी आपले आजोबा स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवत तरुणांची संघटन बांधणी करत संजीवनी युवा प्रतिष्ठानची ७ वर्षांपूर्वी स्थापना केली. अनेक सहकारी संस्थांमध्ये विवेक कोल्हे आपली कर्तव्ये पार पाडत आहे. तसेच संस्थात्मक राजकारणात मोठया प्रमाणात यश मिळताना दिसत आहे.
२०२१ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात कोपरगाव मतदारसंघात ३१ ग्रामपंचायत निवडणुक झाल्या. यामध्ये त्यांनी आपले पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे यांच्या गटाचा धुव्वा उडवत ३१ पैकी २२ ग्रामपंचयती ताब्यात घेऊन आपले नेतृत्व गुण सिद्ध केले.
गणेश कारखान्याच्या निवडणुकीत गेल्या १५ दिवसांपासून मेहनत घेत विखे पाटलांच्या गडात येऊन त्यांच्या पॅनलचा पराभव केल्याने विवेक कोल्हेंचे राजकीय भविष्य उज्वल असल्याची चर्चा संपूर्ण नगर जिल्ह्यात रंगत आहे.