• Sat. Sep 21st, 2024

Vasai Virar News : विरारमध्ये पाणीटंचाईच्या भीषण झळा ; नागरिकांनी काढला पालिकेवर जनआक्रोश मोर्चा

Vasai Virar News : विरारमध्ये पाणीटंचाईच्या भीषण झळा ; नागरिकांनी काढला पालिकेवर जनआक्रोश मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, वसई विरार : विरार पूर्व भागाला मागील अनेक दिवसांपासून पाणीटंचाईच्या भीषण झळा बसत असून अनेक भागांमध्ये आठवडाभरातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या विरारवासींनी रविवारी पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला. या भागात आधीच तीन ते चार दिवसांआड पाणी येते. त्यातच आता पावसाने ओढ दिल्याने उकाडा वाढला असताना, आठ दिवसांतून एकदा पाणी येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या हालांना पारावार उरलेला नाही. या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला जाब विचारण्यासाठी रविवारी हजारोंच्या संख्येने नागरिक अखेर पालिकेच्या कार्यालयावर धडकले.

विरार पूर्व भागातील फुलपाडा, मनवेल पाडा, कारगिल नगर, सहकार नगर या भागांतील रहिवाशांना मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच ऐन उन्हाळ्यात तीन ते चार दिवसांआड पाणी येत असल्याने त्यांचे पाण्यावाचून हाल झाले. मागील दोन आठवड्यांपासून तर आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि स्थायी समितीचे माजी सभापती सुदेश चौधरी यांनी जनआक्रोष मोर्चाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत त्रस्त नागरिकांनी रविवारी पाण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढला होता.

या मोर्चामध्ये दोन हजाराच्या आसपास नागरिक सहभागी झाले होते. यावेळी पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून पालिकेला जाब विचारण्यात आला. आंदोलकांनी या मुद्द्यावरून पालिकेचे डेप्युटी इंजिनीअर प्रदीप पाचंगे आणि प्रभारी साहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना लेखी निवेदन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed