पुणे, दि. १९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘जी-२०’ शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त ‘संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र ज्ञानाची सुनिश्चिती’ या विषयावर आयोजित चर्चासत्राअंतर्गत आज तीन वेगवेगळ्या सत्रात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
पहिल्या सत्रात भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, ‘मिश्र पद्धतीने मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिकवण्याचे शिक्षण, दृष्टिकोन आणि अध्यापनशास्त्र’ या विषयावर चर्चा झाली. त्यामध्ये स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेतील सदस्य चर्चेत सहभागी झाले.
दुसऱ्या सत्रामध्ये ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचा अभ्यास घरामध्ये राहून (होम लर्निंग) करताना पालक, मुलांची काळजी घेऊन त्यांना सांभाळणारे आणि समुदायातील सदस्यांच्या भूमिका’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये सामाजिक-भावनिक कौशल्ये आणि मुलांचे आरोग्य आणि पोषण, याविषयावर वक्त्यांनी विचार मांडले. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव अदिती दास राउत यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी अमेरिका आणि चीनचे प्रतिनिधी गट चर्चेत सहभागी झाले.
तिसरे सत्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षा निधी छिब्बर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. हे चर्चासत्र बहुभाषिकतेच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रासाठी शिक्षकांची क्षमता बांधणी आणि प्रशिक्षण यावर केंद्रित होते. या सत्रातील चर्चेत ब्रिटन, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओईसीडी), सौदी अरेबिया आणि युनिसेफचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ प्रदर्शनाला प्रतिनिधींची भेट
दरम्यान ‘मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस जोडून आयोजित शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या बहुमाध्यम प्रदर्शनाला प्रदर्शनाला ‘जी-२०’ बैठकीला आलेल्या देश विदेशातील प्रतिनिधींनी भेट देऊन विविध दालनांची माहिती घेतली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित या प्रदर्शनात भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि उपक्रमात परदेशी प्रतिनिधींनी विशेष रुची दाखविली. भारतातील संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगतीचा जगातील इतर देशांना लाभ मिळत असल्याने या क्षेत्रात भारताकडून येणाऱ्या काळात सहकार्य मिळेल अशी अपेक्षा यावेळी प्रतिनिधींनी व्यक्त केली. युनिसेफ, ओईसीडी, स्पेन, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि युएई च्या प्रतिनिधींनी आयुका, एनसीईआरटी, सीबीएसई, गुवी, आयुका, आयसरच्या उपक्रमांची माहिती उत्सुकतेने घेतली.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांबरोबरच भारतीय ज्ञान परंपरेतील बाबींचा प्रदर्शनात समावेश आहे. पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलात २२ जूनपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.