• Mon. Nov 25th, 2024
    शिंदेंची शिवसेना भाजपची डोकेदुखी वाढवणार? २०१९ मध्ये जिंकलेल्या मतदारसंघावर ठोकला दावा

    म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यात देण्यात यावी, असा ठराव भंडारा जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांच्या अध्यक्षतेखाली रावणवाडी येथे रविवारी ही सभा झाली. सध्या या मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे हे खासदार आहेत. विद्यमान खासदार असतानाही शिवसेनेकडून अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

    शिवसेनेचे भंडारा जिल्ह्यात एक आमदार आहे. तीनही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकत उभारल्या गेली आहे. इतकेच नाही तर गोंदिया जिल्ह्यातही शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिसून येते. त्यामुळे शिवसेनेचे अनेक उमेदवार येथून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे देण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला. लवकरच तो पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीचे नरेंद्र भोंडेकर हे एकमेव आमदार असल्याने त्यांना मंत्रीमंडळात स्थान देऊन पालकमंत्री करण्यात यावे, असा ठरावसुद्धा बैठकीत घेण्यात आला. सोबतच राज्य शासनाच्या अशासकीय समित्यांची लवकरच घोषणा करून ६०-४० या प्रमाणात जिल्हा व तालुकास्तरावर समित्यांमध्ये स्थान देण्यात यावे हाही ठराव या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, साकोली, भंडारा, पवनी, या चारही नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांनी केले. या बैठकीत सदस्य नोंदणी, गाव तिथे शाखा, बुथ समित्या तयार करणे, जिल्हा कार्यकारिणी तयार करणे व पुर्नगठीत करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्ष संघटन वाढविण्याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

    ठाकरेंच्या आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात, शिंदेंकडून थाटात स्वागत

    ग्रामीण महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना गळाला लावलं, आता चंद्रशेखर रावांची ठाण्यात एन्ट्री, CM शिंदेंना आव्हान ?

    दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील ‘टिफीन बैठकीत’ निवडणूकप्रमुखच संभाव्य उमेदवार राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. सर्वच मतदारसंघांमध्ये हे प्रमुख असल्याने शिंदे गटाचे काय, हा प्रश्न चर्चेला आला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील २४० जागा भाजप लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. यानंतर वाद उफाळून आला होता. हे सारे घडत असतानाच भंडारा जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचे काय, ही चर्चाही वाढली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed