हेमंत रामकृष्ण थोरात (वय ६४) आणि त्यांची पत्नी सुनिता (वय ५८, दोघे रा. सेवा मित्र मंडळाजवळ, चिंचेची तालीम, शुक्रवार पेठ) अशी मृतावस्थेत सापडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचेची तालीम येथील आशा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील फ्लॅटमध्ये थोरात दाम्पत्य राहत होते. त्यांना एक मुलगा व मुलगी असून, ते दोघेही नोकरीच्या निमित्ताने परदेशात असतात.
थोरात एका सहकारी बँकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांनी रविवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या एका मित्राला फोन करून घरी येण्यास सांगितले. त्यानुसार ते मित्र सकाळी आठच्या सुमारास घरी आले. त्या वेळी त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते थेट फ्लॅटमध्ये गेले असता त्यांना थोरात यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. सुनीता या बेडरूममध्ये पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. थोरात यांच्या मित्रांनी तत्काळ शेजारी व नातेवाइकांना हा प्रकार सांगितला. तसेच, खडक पोलिसांना घटनेची माहिती दिली.
काही वेळात खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत फोन करून रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती. डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. थोरात यांनी आत्महत्या का केली, हे स्प्ष्ट झाले नाही; तसेच सुनीता यांचा मृत्यू कसा झाला याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुनीता आजारी होत्या. त्यांच्या शेजारी पोलिसांना दोरी व उशी आढळून आली आहे. मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.