• Sat. Sep 21st, 2024
पाणीकपातीची टांगती तलवार; पाऊस लांबल्यास नवी मुंबईत आठवड्यातून इतके दिवस पाणीपुरवठा बंद

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : जून महिन्यातील पंधरा दिवस उलटून गेले, तरी अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा आता कमी होत आहे. पाऊस लांबल्याने सर्वांनाच भविष्यातील पाण्याची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, २० जूनपर्यंत चांगला पाऊस झाला नाही, तर नवी मुंबई शहरात पाणीकपात करण्याचा विचार महापालिका करत आहे. त्यानुसार, सध्या विभागवार आठवड्यातून एक दिवस बंद राहणारा पाणीपुरवठा आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिकेला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो. महापालिकेचे हे स्वतःचे मालकीचे धरण आहे. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेची स्थिती चांगली आहे. शहरातील नागरिकांना कधीही पाणीटंचाई किंवा पाणीकपातीचा सामना करावा लागलेला नाही. मात्र यावर्षी पावसाने ओढ दिल्याने पाण्याची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईत विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

Mumbai News: वाहतुकीची अडचण मिटणार, गोखले रेल्वे उड्डाण पुल कधी सुरु होणार? महापालिकेनं दिली माहिती
मागील वर्षी याच दरम्यान मोरबे धरणात ३०.१९ टक्के पाणीसाठा होता. मात्र यावर्षी हा साठा २५.३८ टक्के इतकाच आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात ७०.७९ मीटरपर्यंत पाण्याचा साठा होता, तो आज ६९.०९ मीटर इतका राहिला आहे. शहराची दररोजची पाण्याची गरज लक्षात घेता, पुढील ४२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचीही चिंता वाढली आहे. आता २० जूनपर्यंत तरी धरण परिसरात पाऊस पडणे गरजेचे आहे. अन्यथा पाण्याची चिंता वाढणार आहे.

या वर्षी पाऊस लांबणीवर गेला असल्याने आणि पावसाचे प्रमाण कमी असल्याने, सर्व प्राधिकरणांनी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, असे आदेश राज्य सरकारने सर्व प्राधिकरणांना व महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बैठक घेऊन २८ एप्रिलपासून विभागवार आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी पाणीकपात लागू केली आहे. यानुसार सद्यस्थितीत प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. मात्र यापुढे प्रत्येक विभागात आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा विचार महापलिका करत आहे.

मोरबे धरणाला कोरड

गेल्या वर्षी मोरबे धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे धरण पूर्णपणे भरून वाहू शकले नाही. त्यातच, या वर्षी आतापर्यंत धरणक्षेत्रात अगदी अल्प पाऊस झाला आहे. १५ जूननंतर पाऊस वाढणे अपेक्षित होते. मात्र तसेही झाले नाही. पावसाने पाठ फिरवल्याने, धरणातील पाणीसाठा आटत आहे. २० जूनपर्यंत अशीच परिस्थिती राहिली, तर शहरात आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करण्याचा विचार महापालिका करत आहे.

मोरबे धरणातील पाणीसाठा

मागील वर्षी (यावेळी) ३०.१९ टक्के

सध्या २५.३८ टक्के

पुढील ४२ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

वेली वटवृक्षाचे वाकडे करु शकत नाहीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed