• Sat. Sep 21st, 2024

Yavatmal News : नवजात बाळाच्या पोटावर दिले बिब्याचे चटके; अघोरी कृत्यानं महाराष्ट्र हादरला

Yavatmal News : नवजात बाळाच्या पोटावर दिले बिब्याचे चटके; अघोरी कृत्यानं महाराष्ट्र हादरला

म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : सतत रडत असलेल्या एका पाच दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके देण्यात आले. घाटंजी तालुक्यातील एका गावात तीन दिवस हा अघोरी उपाय करण्यात आला. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने बाळाला येथील वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती चिंताजनक असून, डॉक्टर त्याच्यावर उपचार करीत आहे.काय आहे प्रकरण?

घाटंजी तालुक्यातील दुर्गम भागात राहत असलेल्या एका महिलेची प्रसूती आठवड्यापूर्वी पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. मुलीच्या रुपाने घरी लक्ष्मी आली; म्हणून मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांनी आनंद साजरा केला. आरोग्य केंद्रात माता व बाळाची प्रकृती चांगली होती. चार दिवसांनंतर दोघांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. घरी आल्यावर बाळाची प्रकृती चांगली होती. मात्र, रात्री बाळाची प्रकृती बिघडली. बाळ सतत रडत असल्याने घरातील सगळे काळजीत पडले. बाळाचे पोट दुखत असेल किंवा छातीत खोकला दाटला असेल; म्हणून बाळ रडत आहे; तसेच बिब्बा गरम करून त्याचे चटके पोटावर दिल्यास बाळाला बरे वाटेल, असे काही ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र दूर होते. रात्रीची वेळ असल्याने बाळाची तडफड पाहून शेवटी आई-वडिलांनी ज्येष्ठांच्या सांगण्यावरून अघोरी उपाय केला; पण सतत तीन दिवस बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून चटके दिले, तरी बाळाचे दुखणे कमी झाले नाही. उलट प्रकृती जास्त चिंताजनक झाली. शेवटी आई-वडिलांनी बाळाला घेऊन यवतमाळ गाठले. एका खासगी डॉक्टरला दाखवले. बाळाची अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना नागपूर येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी बाळाला शनिवारी वसंतराव नाईक सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणले.

संपूर्ण शरीर पांढरफटक, त्वचेला जागोजागी भेगा; ‘हार्लेक्विन बेबी’ पाहून कुटुंब, डॉक्टर घाबरले
रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाला दाखल करून घेतले असून, त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. या घटनेने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed